
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात मागील दोन महिन्यांहून अधिक काळ शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथे झालेल्या शेतकरी महापंचायतीत त्या म्हणाल्या की, ‘मोदी सरकारने आपल्या दोन, तीन मित्रांसाठी संपूर्ण देश विकला आहे. अशाच प्रकारे हे तुमची शेतीही विकतील.’
प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या डोळ्यात अश्रू होते, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हसत होते. पंतप्रधानांनी उसाचे थकीत देण्याचे आश्वासन दिले होते. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. उत्पन्न वाढलं का?’
LIVE: Smt. @priyankagandhi addresses Kisan Panchayat in Muzaffarnagar,UP. #Kisan_Sang_Priyanka_Gandhi https://t.co/tKtQG4KqNQ
— Congress (@INCIndia) February 20, 2021
प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या की, ‘दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान करण्यात आला आहे. जे शेतकरी देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या मुलांना सीमेवर पाठवतात त्यांचाच अपमान केला जात आहे. त्यांना देशद्रोही म्हटले गेले, त्याला दहशतवादी म्हटले गेले. पंतप्रधानांनी संसदेत शेतकरी आंदोलनाची थट्टा केली आणि शेतकऱ्यांना परजीवी म्हटले.’



























































