कोरोनामुळे योगी सरकारचं धाबं दणाणलं; लखनौची स्थिती गंभीर, लॉकडाउन संदर्भात मंत्र्यांनी लिहिलं पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
up-corona

उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दररोज कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगानं वाढत चालला असून सर्वात भयंकर स्थिती राज्याची राजधानी लखनौची आहे. रुग्णालयाच्या बाहेर कोरोनाग्रस्तांची रांग लागली आहे, तर दुसरीकडे सश्मानभूमीवर देखील अंत्यसंस्कारासाठी रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या महासंकटामुळे राज्याचे कॅबिनेट मंत्री बृजेश पाठक यांनी एक पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये त्यांनी अगदी स्पष्ट म्हटलं आहे की खराब व्यवस्थेवर तातडीने लक्षं दिलं गेलं नाही तर लखनौमध्ये लॉकडाउन करावं लागू शकतं.

यूपीतील योगी सरकारचे कायदे मंत्री बृजेश पाठक यांनी आरोग्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, खासगी रुग्णालयात कोरोना चाचणी बंद झाली आहे, जे अत्यंत चुकीचे आहे. शहरात सध्या 17 हजार कोविड तपासणी किट आवश्यक आहेत, मात्र फक्त 10 हजार उपलब्ध आहेत. कोरोना चाचणीचा रिपोर्ट मिळण्यासाठी 4 ते 7 दिवस लागत आहेत.

बृजेश पाठक यांनी ही चिट्ठी राज्याचे मुख्य आरोग्य सचिव, अपर मुख्य आरोग्य सचिव यांना लिहिली आहे. मंत्री महोदयांचं म्हणणं आहे की लोक सातत्यानं मदतीसाठी फोन करत आहेत, मात्र सुविधाच उपलब्ध नसल्यानं मदतही करता येत नाही अशी स्थिती आहे.

इतकंच नाही तर मंत्री महोदयांनी तक्रार देखील केली आहे की, आरोग्य अधिकारी फोनही घेत नाहीत, त्यामुळे स्थिती अधिक गंभीर आहे. लखनौसह अन्य शहरातील रुग्णालयात बेड्सची संख्या वाढवण्यात यावी आणि तसंच टेस्टिंग देखील वाढवण्यात यावं.

letter_l

लखनौमध्ये दररोज 4 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. अनेक ठिकाणी तर तपासणीसाठी किटही मिळत नाही. बेड कमी असल्यानं रुग्णालयात प्रवेशही मिळत नाही अशी स्थिती आहे.