यूपीतील 8 शहरांची हवा अत्यंत खराब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्यातील 8 शहरांची हवा अत्यंत खराब झाली आहे. बुधवारी या शहरांतील अनेक नागरिकांनी प्रदूषणात घुसमट होऊ नये म्हणून घराबाहेर पडणे टाळले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्कर्षानुसार, गाझियाबाद हे संपूर्ण देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले.

दिवाळीत मोठय़ा प्रमाणावर फटाके फोडले जातात. त्यामुळे सर्वच शहरांमध्ये प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. या पार्श्वभूमीवर देशभरातील प्रमुख शहरांचे सर्वेक्षण करून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपला अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार देशातील सुरुवातीच्या दहा प्रदूषित शहरांमध्ये उत्तर प्रदेशातील आठ शहरांचा समावेश आहे. या शहरांतील एअर क्वॉलिटी इंडेक्स 400 हून अधिक म्हणजेच अत्यंत खराब पातळीवर राहिला. सर्वाधिक प्रदूषित गाझियाबादमध्ये 478 इतक्या एअर क्वॉलिटी इंडेक्सची (एक्यूआय) नोंद झाली.

दिवाळीनंतर प्रदूषण भयंकर वाढले

उत्तर प्रदेशबरोबरच हरयाणा आणि दिल्ली या शहरांतील वायू प्रदूषण ऑक्टोबरच्या दुसऱया आठवडय़ापासूनच वाढीस लागले होते. परंतु, दिवाळीनंतर या प्रदूषणाच्या पातळीत भयंकर वाढ झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत आढळले आहे.

प्रमुख शहरे व तेथील प्रदूषण (एक्यूआय)

पानिपत – 475
बल्लभगढ – 467
बागपत – 461
नोएडा – 450
ग्रेटर नोएडा – 438
हापूड – 435
मेरठ – 430
दिल्ली – 419