हिंस्र प्राण्यांच्या जंगलात दोन रात्रींचा थरार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एक व्यक्ती बिबटय़ापासून जीव वाचवण्यासाठी नदीत उडी मारतो. नदी पार करत तो थेट जंगलात पोचतो. हिंस्र प्राण्यांनी भरलेल्या जंगलात तो चक्क दोन रात्री जीव मुठीत धरून राहतो. अखेर तिसऱया दिवशी त्याची सुटका होते. अतिशय थरारक अशी घटना घडलेय उत्तराखंडच्या राजाजी वनक्षेत्रात हा थरार घडला.

फुगे विक्रेता अनुराग सिंह गुरुवारी ऋषिकेशहून त्याच्या घरी बिजनौरला जात होता. रस्त्यात राजाजी व्याघ्र संरक्षण प्रकल्प येतो. तिथून संध्याकाळी जात असताना गंगा नदीच्या किनाऱयाजवळ त्याने मोटारसायकल थांबवली आणि तो सेल्फी काढण्यात मग्न झाला. त्याचवेळी झाडीतून बिबटय़ाने त्याच्यावर झडप घातली. घाबरून अनुरागने नदीत उडी मारली.

त्यानंतर पुढे काय घडलं, याची माहिती  पोलीस अधिकारी  प्रवीण रावत यांनी दिली. रावत म्हणाले, नदीत उडी मारताच लाकडाच्या ओंडक्याच्या मदतीने अनुराग जंगलकिनारी पोहोचला. त्याची  बॅग वॉटरप्रूफ होती. बॅगेत माचिस होती. या माचिसचा वापर करून अनुरागने थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवली. रात्रभर तो झाडावर बसला. दुसऱया दिवशी तो जंगलभर फिरला. पण त्याला मानवी वस्ती दिसली नाही. दुसरी रात्रदेखील अनुरागला जंगलात काढावी लागली. शनिवारी सकाळी अनुरागने पायपीट सुरू केली. तो हरिद्वार येथील शदाणी घाटाजवळ पोहोचला. त्याने पुन्हा आग पेटवली. पोलिसांनी धूर पाहिला आणि अनुरागची सुटका केली.