
योग गुरू बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीच्या पाच औषधांवर उत्तराखंड सरकारने बंदी घातली होती. ती बंदी अवघ्या तीन दिवसांत मागे घेण्यात आली आहे. रविवारी ही बंदी हटवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
दिव्य फार्मसीच्या पतंजली ब्रँडखालील मधुमेह, रक्तदाब, ग्लुकोमा, उच्च कोलेस्टेरॉल, गलगंड या आजारांना प्रतिबंध घालणाऱ्या पाच औषधांवर उत्तराखंडच्या आयुर्वेद आणि युनानी औषध परवाना प्राधिकरणाने बंदी घातली होती. बीपीग्रिट, मधुग्रिट, थायरोग्रिट, लिपिडोम टॅबलेट, आयग्रिट गोल्ड टॅबलेट या पाच औषधांवर ही बंदी घालण्यात आली होती.
या औषधांच्या प्रमाणित संयुगांविषयी अहवाल मागण्यात आला होता. जोपर्यंत नवीन संयुगांना मंजुरी मिळत नाही तोपर्यंत नवीन औषध उत्पादनावर बंदी घालण्यात आली होती. केरळ येथील एका डॉक्टरच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली होती. दिव्य फार्मसीतर्फे निर्घारित औषध नियम पाळले जात नसल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला होता. त्याचा तपास करून ही बंदी घालण्यात आली होती.
मात्र, अवघ्या तीन दिवसांत प्राधिकरणाने ही बंदी चुकीची असल्याचं म्हटलं आहे. प्राधिकरणाने ही बंदी उठवली असून ही बंदी घाईघाईत घातली गेल्याचं प्राधिकरणातर्फे सांगण्यात आलं आहे.




























































