
पन्नाशी पार केलेल्या तरुणांची दमदार ‘उत्तरार्ध एकांकिका स्पर्धा’ ठाण्यातील गडकरी रंगायतच्या तालीम हॉलमध्ये उत्साहात पार पडली. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास 15 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यातील पाच स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. येत्या 2 एप्रिलला अंतिम फेरी पार पडणार आहे.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद शाखेच्या सहकार्याने मोरया इव्हेंट्स अॅण्ड एंटरटेन्मेंट यांनी या उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे वैशिष्टय़ म्हणजे या नाटय़ स्पर्धेत सहभागी होणाऱया लेखक, दिग्दर्शक आणि कलाकारांसाठी 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटाची अट ठेवण्यात आली होती. त्यानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, अलिबाग, चिपळूण, पुणे, नाशिक, सातारा आणि सोलापूर येथील एकूण 15 संघांनी सहभाग घेतला होता. सर्व संघानी उत्तम सादरीकरण करून सर्वांचे मन जिंकले. या स्पर्धकांपैकी पाच संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. स्पर्धेला दिलीप कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तर विशाल कदम आणि विनोद जाधव यांनी परीक्षक म्हणून स्पर्धकांचे कौतुक केले.
या पाच संघांची निवड
प्राथमिक फेरीतून ‘प्राण’, मुंबई संघाचे – ‘साठी’, कला संस्कृती, ठाणे ‘आर्टिकल 21’, रंगा थिएटर्स, ठाणे ‘तरुणाई’, मित्र सहयोग, ठाणे ‘अनोळखी’, ठाणे आर्ट गिल्डचे ‘ती येते आणिक जाते’ या पाच संघांच्या एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या आहेत. 2 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून गडकरी रंगायतन येथे स्पर्धेची अंतिम फेरी पार पडणार असून प्रेक्षकांनी या नाटय़ महोत्सवाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




























































