
नोकरभरती, जागाखरेदीसह इतर विषयांवरून नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सर्वसाधारण सभेमध्ये जोरदार गदारोळ झाला. तब्बल दोन वर्षांच्या अवधीनंतर ऑफलाइन झालेल्या माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत जागा खरेदी, डाटा सेंटर, नोकरभरती, इतिवृत्तातील नोंदी तसेच इतर विषयांमुळे शिक्षकांमध्येच हमरीतुमरी झाली. या गदारोळात ध्वनिक्षेपकही तोडण्यात आला.
सत्ताधाऱयांना जाब विचारण्यासाठी विरोधक त्यांच्या अंगावर धावून गेल्यामुळे एकच खळबळ उडाली. एकमेकांना अरेरावीची भाषाही यावेळी वापरण्यात आली. अर्धा तास हा गोंधळ सुरूच होता. त्यामुळे नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत वादंग झाल्यामुळे सोसायटीच्या कारभाराबाबत चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची 79वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष सुरेश मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रास्ताविकात मिसाळ यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीची माहिती दिली. सचिव स्वप्नील इथापे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन सुरू केल्यानंतर दहा मिनिटांतच गदारोळाला सुरुवात झाली. विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे यांनी सभासदांनी मांडलेले महत्त्वाचे विषय इतिवृत्तातून गायब केल्याचा आरोप करताच काही सभासद व्यासपीठासमोर येऊन गोंधळ घालू लागले. सभासद महेश दरेकर यांनी ऑनलाइन कारभारावर ताशेरे ओढले. याचे स्पष्टीकरण ज्येष्ठ संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे देत असताना विरोधी संचालक बाबासाहेब बोडखे यांनी ध्वनिक्षेपक हातात घेण्याचा प्रयत्न केला. यावर काही सभासदांनी आरडाओरड सुरू केली. यावर आप्पासाहेब शिंदे संतप्त झाले. त्यांनी संचालक असूनही बोलू दिले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली.
यावेळी विरोधी संचालक महेंद्र हिंगे यांनी फक्त अध्यक्षांनीच प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी केली. यावर अध्यक्ष मिसाळ यांनीही ही सभा संचालकांची नाही सभासदांची सभा आहे, यामुळे संचालकांनी न बोलता सभासदांना बोलू द्यावे, असे मत मांडले. शिक्षक नेते सुनील दानवे यांनी जागा खरेदीचा प्रश्न उपस्थित केला. संस्था यापुढे जागा खरेदी करणार नाही, असे ठरले असताना आज जागा खरेदीचा विषय का घेतला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर कचरे यांनी फक्त विषय मांडला आहे, त्याला मंजुरी द्यायची की नाही हे सभासदांनी ठरवावे, असे उत्तर दिले. यावेळी काही सभासदांनी व्यासपीठावर येऊन गोंधळ सुरू केला. यात ध्वनिक्षेपकही तुटला.
संचालक आप्पासाहेब शिंदे यांनी नोकर भरतीत कोविडमुळे मयत झालेल्या सभासदांच्या वारसांना प्राधान्य का दिले नाही, असा मुद्दा उपस्थित केला. यावर कचरे यांनी तसा एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याचा खुलासा केला. आप्पासाहेब शिंदे यांनी ही सभा जूनऐवजी मेच्या कडक उन्हात का घेतली, ही सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. कचरे यांनी सभा कधी घ्यायची याचा अधिकार संचालक मंडळाला असतो. यापुढेही मेमध्येच सभा घेण्याचा ठराव घेण्यात आला. शिक्षकेतर संघटनेचे नेते भाऊसाहेब काकडे यांनी कर्जाचा व्याजदर वाढवू नये व कर्जाचे हप्ते 180 वरून 200 करण्याची मागणी केली.
शेवटी संचालक बोडखे यांनी संस्थेला डाटा सेंटरची गरज नसल्याचे सांगून हा विषय नामंजूर करण्याची मागणी केली. मात्र, कचरे यांनी डाटा सेंटरची काळाची गरज स्पष्ट केली. यावरून गदारोळ होऊन आवाजी मतदानाने सर्व विषय मंजूर करण्यात आले. संस्थेची कर्ज मर्यादा 18 लाख रुपये करण्यात आली. कृतज्ञता निधीत तीन हजार रुपये वाढ करण्यात आली. जनता अपघात विमा एक लाखावरून दोन लाखांवर करण्यात आला. डाटा सेंटरमधील सर्व्हर भाडेतत्त्वावर घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. तसेच अकोले, पारनेर, नेवासा, राहता, कोपरगाव, कर्जत शाखांसाठी जागा खरेदीचा विषय यावेळी मार्गी लावण्यात आला.






























































