महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर 754 अनुयायांचे लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाणदिनी दादरच्या चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांसाठी मुंबई महापालिकेने दोन दिवस राबवलेल्या लसीकरण मोहिमेत 754 जणांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. पालिकेच्या जी-उत्तर विभागाकडून ही व्यवस्था करण्यात आली होती.

मुंबईत कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी राज्य सरकार आणि मुंबई महापालिका सतर्क असून महापरिनिर्वाणदिनी अनुयायांसाठी दोन दिवस विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात आली. सर्व प्रकारची खबरदारी घेत पालिकेच्या जी-उत्तर विभागाने 5 आणि 6 डिसेंबरला 754 जणांचे लसीकरण केले. यात 298 जणांना पहिला डोस तर 456 जणांना दुसरा डोस देण्यात आला.

चैत्यभूमीवरून जमा करण्यात आलेले सुमारे 750 किलो निर्माल्य धारावी येथील घनकचरा प्रकल्पाकडे सोपवण्यात आले. तिथे त्याचे योग्य ते वर्गीकरण करून त्यापासून खत निर्माण केले जाणार असून महापालिकेच्या उद्यानात त्याचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती जी–उत्तरचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.