18 ते 44 वयोगटातील लसीकरण तूर्त स्थगित; 45 वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुसऱया डोसच्या प्रतीक्षेत राज्यात 20 लाख नागरिक आहेत. या गटासाठी लस पुरवठा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मात्र लसीचा देशात मोठा तुटवडा असल्याने दुसऱया डोसच्या प्रतिक्षेतील नागरिकांची 45 ते 60 दिवसांची मुदत संपत आहे. म्हणून 18 ते 44 वयोगटासाठी राज्याने खरेदी केलेली लस 45 वयोगटाला वापरण्याचा निर्णय राज्याने घेतला असून यासाठी 18 ते 44 गटाचे लसीकरण तूर्त स्थगित करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे राजेश टोपे यांनी आज सांगितले.

राज्यात 16 लाख नागरिक कोविशील्डसाठी तर 4 लाख नागरिक कोव्हॅक्सीनच्या लशीच्या दुसऱया डोसच्या प्रतीक्षेत आहेत. राज्याकडे सध्या 7 लाख कोविशिल्डचे तर 3 लाख कोव्हॅक्सीनचे डोस आहेत. हे डोस आता 45 वर्षांवरील ज्या नागरिकांना दुसरा डोस द्यायचा आहे त्यांच्यासाठी वापरण्यात येतील, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

18 ते 44 मधील 5 लाख नागरिकांना पहिला डोस

1 मे पासून केंद्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास राज्यांना परवानगी दिली होती. अर्थात, या वयोगटासाठी लस खरेदी राज्याने करायची होती. 1 मे हा लस टोचण्याचा राज्य स्थापना दिनाचा मुहूर्त पकडण्यासाठी अपुऱया लसीच्या पुरवठय़ावर राज्य सरकारने प्रारंभ केला होता. आजपर्यंत या गटाच्या 5 लाख नागरिकांना पहिला डोस दिला आहे.

लस उपलब्ध झाल्यानंतर पत्रकारांनाही प्राधान्य

पत्रकारांना प्राधान्याने लस दिली जाणार का या प्रश्नावर बोलताना राजेश टोपे यांनी सध्या लसीचा तुटवडा आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर पत्रकारांनाही प्राधान्याने लस देण्याबाबत विचार केला जाईल. पत्रकारांना रेल्वे प्रवासाबाबतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील असे राजेश टोपे यांनी सांगितले.

20 मेनंतर 18 ते 44चे पुन्हा लसीकरण सुरू

20 मे नंतर सीरम इन्स्टिटय़ूटने राज्याला प्रतीमाह 1 कोटी लस डोस देण्याचे आश्वासन दिले आहे. ती लस मिळताच पुन्हा 18 ते 44 वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण सुरु होईल, असे टोपे यांनी आश्वस्त केले. 18 ते 44 वर्षातील ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांनी काळजी करू नये, त्यांना वेळेत दुसरा डोसही दिला जाईल, असे टोपे यांनी सांगितले.