
कणकवली सिंधुदुर्ग विभागातील एसटीच्या 400 शेड्युल व 1800 फेऱ्यांपैकी 275 शेड्युल व 1317 बसफेऱ्या सुरु झाल्या आहेत. तसेच 1 डिसेंबरपासून विद्यार्थी पासेसही सुरू करण्यात आले आहेत. काहीजण यात राजकारण करुन कर्मचाऱ्यांच्या भावना भडकविण्याचे काम करत आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थी , नागरीकांची गैरसोय होणार नाही. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवालही तातडीने देण्याबाबतची व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी समस्यांबाबत वैभव नाईक यांनी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांची भेट घेतली. यावेळी कुडाळचे आगार व्यवस्थापक सुजित डोंगरे , मालवण नरेंद्र बोधे , प्रकाश नेरूरकर , श्रीमती एस . एस . नाडकर्णी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते .
मुंबई, ठाणे येथे नैमित्तीक करारावर पाठविलेल्या बसेस व चालक, वाहक हे स्थानिक पातळीवर गैरसोय करुन पाठविलेले नाहीत, असे विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी सांगितले. सर्व फेऱ्या सुरू नसल्याने काही चालक वाहकांना पाठविण्यात आले आहे. यावेळी झालेल्या चर्चेत एसटी वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आल्यानंतर आतापर्यंत जवळपास 60 टक्क्याहून अधिक फेऱ्या सुरु झाल्या असल्याचे वैभव नाईक यांना रसाळ यांनी सांगितले .
जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठी 1 डिसेंबरपासून प्रत्येक आगारात पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे . आयटीआयच्या विद्यार्थ्यांना पास देण्यात आलेले आहेत. ज्या शाळा सुरू झालेल्या आहेत , त्या 100 टक्के विद्यार्थ्यांना एसटीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच प्रवासी उपलब्धतेनुसार इतर बसफेऱ्याही सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आमची कोणतीही शेड्युल बंद करुन चालक , वाहक पाठविलेले नाहीत, असे त्यांनी सांगितले.
मुंबई, ठाण्यातून आलेल्या चालक, वाहकांची कोरोना टेस्ट करण्यास विलंब होऊ नये, तसेच त्यांचे अहवालही तातडीने मिळण्याच्या दृष्टीने ओरोस येथे चर्चा करुन नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यात राजकारण करण्याचा कुणी प्रयत्न करु नये ,असा इशारा नाईक यांनी दिला.
































































