Vaibhav Suryavanshi चा भीम पराक्रम, 12 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत बाबर आझमलाही टाकलं मागे

टीम इंडियाच्या 19 वर्षांखालील संघाने इंग्लंडच्या 19 वर्षांखालील संघाचा चौथ्या वनडेमध्ये 55 धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांची वनडे मालिका जिंकली. या सामन्यात वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ गोंगावल आणि या वादळाच्या तडाख्यात इंग्लंडचे गोलंदाज पत्त्यांसारखे उडून गेले. वैभव सूर्यवंशीने 52 चेंडूंमध्ये शतक ठोकत इतिहास रचला. याचसोबत त्याने 12 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढत बाबर आझमलाही मागे टाकलं आहे.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने जबरदस्त फटकेबाजी करत इंग्लंडला 363 धावांच तगड आव्हान दिलं होतं. सलामीला आलेल्या वैभवने तडाखेबंद फलंदाजीच प्रदर्शन करत 52 चेंडूंमध्ये शतक ठोकलं. तसेच त्याने 78 चेंडूंमध्ये 10 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 143 धावांची खेळी केली. त्याला विहान मल्होत्राची (129) चांगली साथ मिळाली. वैभवच हे शतक विशेष ठरलं आहे. त्याने वयाच्या 14 वर्ष 100 व्या दिवशी शतक ठोकत विक्रम प्रस्थापित केला आहे. वैभव आता युवा वनडे क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. त्याने बांगलादेशच्या नजमुल हसन शांन्तोचा 12 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. त्याने 2013 साली श्रीलंकेविरुद्ध 14 वर्ष आणि 241 दिवसांचा असताना शतक ठोकलं होतं. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा बाबर आझम आहे, ज्याने 2009 साली 15 वर्षांचा असताना शतक ठोकलं होतं. वैभवने या सर्वांना पिछाडीवर टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे.