अमेरिकन नागरिकांना लावायचे चुना, वनराई पोलिसांनी केली दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल सिक्युरिटी नंबरच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांना चुना लावणाऱया कॉल सेंटरचा वनराई पोलिसांनी पर्दाफाश केला. आदिल सय्यद आणि योगेश लोहार अशी त्या दोघांची नावे असून ते दोघे पोलीस कोठडीत आहेत. फसवणुकीचे पैसे हे हवालामार्फत त्या दोघांकडे येत होते.

गोरेगाव पूर्वच्या वीटभट्टी येथील एका ठिकाणी कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती वनराई पोलिसांना मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. परिमंडळ-12 चे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक अनिल वाघमारे यांच्या पथकातील अधिकाऱयाने त्या कॉल सेंटरवर छापा टापून आदिल आणि योगेशला ताब्यात घेतले. घटनास्थळाहून पोलिसांनी काही कॉम्प्युटर, लॅपटॉप जप्त केले आहेत. आदिल आणि योगेशने गेल्या दोन महिन्यांपूर्वी वीटभट्टी येथे कॉल सेंटर सुरू केले होते.

त्या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना फोन केले जायचे. तुमच्या सोशल सिक्युरिटी नंबरमध्ये घोळ आहे. त्याची एफडीआय चौकशी करत आहेत. त्यामुळे तुम्ही आमच्या रडारवर आहात असे सांगून ते दोघे अमेरिकन नागरिकांना घाबरवत असायचे. चौकशी होईपर्यंत काही 200-1000 डॉलर हे गिफ्ट कार्डमधून विकत घ्या. ती रक्कम आमच्याकडे जमा राहील. चौकशी पूर्ण झाल्यावर रक्कम परत दिली जाईल अशा भूलथापा ते मारायचे. फसवणुकीची रक्कम त्या दोघांना हवालामार्फत येत होती. आतापर्यंत त्या दोघांना किती रक्कम हवालामार्फत आली, त्या रकमेतून त्या दोघांनी काय खर्च केला याचा तपास वनराई पोलीस करत आहेत. फसवणुकीच्या गुन्ह्यात त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.