
सामना ऑनलाईन । मुंबई
शिवसेनेचे दिवंगत नेते प्रमोद नवलकर यांच्या पत्नी वंदना नवलकर यांचे आज पहाटे मुंबईतील सैफी हॉस्पीटलमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 80 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली, दोन जावई आणि नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या निधनानं गिरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
पाठारे प्रभु समाजातून येणाऱ्या वंदना नवलकर यांनी 1960 मध्ये आपले पदवी शिक्षण पूर्ण केले होते. 1961-70 या काळात त्यांनी मंत्रालयाच्या अर्थविभागात काम केले. 1970 नंतर त्यांनी समाजसेवेसाठी स्वत:चे जीवन वाहून दिले. वंदना ताई व्यासंगी होत्या. 1990 मध्ये त्यांनी प्रभु प्रभात नावाच्या मासिकात लेख लिहण्यास सुरुवात केली. याच मासिकात त्या खजिनदार म्हणून काम देखील पाहात होत्या. 2007 मध्ये त्या प्रभु प्रभातच्या संपादिका झाल्या. याच वर्षी त्या नाना-नानी स्कूल फॉर सिनिअर सिटिझनच्या मुख्याध्यापिका म्हणून निवडल्या गेल्या.
साहित्यासोबतच त्यांनी समाजसेवेचा वसा जपला होता. ‘कुटुंब सखी’च्या त्या सर्वेसर्वा होत्या. ‘कुटुंब सखी’ माध्यमातून त्यांनी लोकप्रिय आणि कल्याणकारी कार्यक्रम राबवले. असंख्य महिलांना मोठया प्रमाणात रोजगार मिळवून दिला होता. व्यवसाय-उद्योगात महिलांनी मागे राहू नये, यासाठी विविध शाळा-संस्थांमधून त्यांनी हजारों महिलांना व्यवसाय मार्गदर्शन केले होते. आपले पती प्रमोद नवलकर यांच्या कार्यात त्यांनी अत्यंत मोलाची साथ दिली. देह व्यापार करणाऱ्या महिला आणि त्यांच्या परिवाराच्या मदतीसाठी त्यांनी अजोड असे कार्य केले आहे. वंदना ताईंनी योग, वैद्यकीय तपासणी कॅम्प, व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे, खेळ, सहली, संगीत, अध्यात्मिक सत्रे असे विविध कार्यक्रम मुंबईत राबवले. त्यातून असंख्य लोकांशी त्या जोडलेल्या होत्या. त्यांच्या अजोड कार्यासाठी त्यांना मिनाताई ठाकरे आदर्श महिला, महिला उद्योजिका पुरस्कार, उत्कृष्ट उद्योग संस्थापक पुरस्कार आणि अशा अनेक विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.
वंदनाताईंच्या निधनानंतर सामन्यांमधून असमान्यत्व घडवण्याचं काम वंदना ताईंनी करत होत्या, अशाच प्रतिक्रिया त्यांच्या सहकाऱ्यांकडून देण्यात आल्या. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आणि कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शिवसैनिकांसह, विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या घरी पोहोचत आहेत.

























































