विविध मागण्यांसाठी वंजारी समाजाचा मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वंजारी समाजाला दहा टक्के आरक्षण मिळावे, जातीनिहाय जनगणना करावी तसेच जिल्हास्तरावर वंजारी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी वंजारी समाज बांधवानी पाथर्डीत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाची सुरुवात बाजार समितीच्या मैदानापासून करण्यात आली. देणार कसे नाही नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही, स्व. गोपीनाथ मुंडे अमर राहे, एकच लक्ष आरक्षण फक्त अशा घोषणा देत व हातात भगवे झेंडे घेऊन व पांढऱ्या टोप्या घालून मोर्चेकरी मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले.

या मोर्चात विविध पक्षात असलेले सर्वच वंजारी समाजाचे नेते सहभागी झाले होते. मात्र, त्यांनी भाषणे करणे टाळले तर या वेळी प्रीती गाडेकर,अश्विनी ढाकणे,शीतल बांगर,कुसुम खेडकर,ज्योती बडे,प्रतीक्षा ढाकणे,सुजाता मुंडे,वैष्णवी पालवे,साक्षी ढोले यांच्यासह सहा वर्षाच्या स्वीटी शिरसाठ यांची भाषणे झाली. वंजारी समाजाला सध्या केवळ दोन टक्के आरक्षण असल्याने आमच्यावर अन्याय होत असून पूर्वी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी दहा टक्के आरक्षण दिले होते मात्र या शासनाने ते कमी करून केवळ दोन टक्क्यावर आणल्याने मोठा अन्याय झाला आहे. वंजारी समाजाच्या मुलांनी केवळ ऊस तोडण्यासाठीच जायचे का, स्व. गोपीनाथ मुंडे महामंडळ स्थापन करून बिनव्याजी कर्ज युवकांना उपलब्ध करून दिल्यास वंजारी समाजातील बेरोजगारी कमी होईल.येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच आरक्षण देण्यात यावे. तालुक्याच्या पूर्व भागाला पाटाचे पाणी मिळायला हवे. ऊसतोड मजुरांच्या मुलांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह बांधून ते मोफत उपलब्ध करून देण्यात यावे अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जर मागण्या मान्य न केल्यास निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकुत असा इशाराही या वेळी देण्यात आला. तहसीलदार नामदेव पाटील यांना क्षेत्रीय वंजारी परिषदेचे अध्यक्ष आदिनाथ आंधळे व सहभागी मुलींच्या हस्ते निवेदन देऊन मोर्चा विसर्जित करण्यात आला.