
कोरोनाचे संकट घोंगावत असताना मंदिरे उघडण्याची घाई करणे भाविकांसाठी धोक्याचे ठरेल. त्यामुळे सरकारने मंदिरे उघडण्याची घाई करू नये, अशी मागणी विविध वारकरी संघटनांनी केली आहे. मंदिरे उघडण्यासाठी होत असलेले आंदोलन हे राजकीय असून वारकऱ्य़ांनी त्यापासून दूर राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
मंदिरे उघडण्याचे निमित्त करून राजकीय आंदोलन केले जात आहे. भोळ्या भाविकांना या आंदोलनात सहभागी करून घेतले जात आहे. त्याला वारकरी संघटनांनी विरोध केला आहे. श्री वारकरी सेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष हनुमंत महाराज तावरे, साडेतीनशे रेल्वे प्रवाशी भजन मंडळाच्या महासंघाचे जयराम पवार, ज्ञानेश्वर महाराज सामाजिक संस्थेचे प्रवीण सावंत, समताधिष्टित वारकरी विचार मंचचे आदिनाथ महाराज पिंपळगावकर या संघटनांनी सरकारच्या मंदिरे बंद ठेवण्याच्या निर्णयाला पाठिंबा देणारे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
मंदिरे उघडण्यासाठी होणाऱ्य़ा आंदोलनातील राजकारणाचा समाचार घेताना हनुमंत महाराज तावरे म्हणाले की, कोरोनाचे संकट भयानक आहे. अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. अशा काळात मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन करणे यात भाविकांचे कोणतेही हित नाही, तर त्यात स्पष्ट राजकारण दिसत आहे. या राजकारणापासून वारकऱ्य़ांनी चार हात दूर रहावे, असे आवाहन तावरे महाराज यांनी केले आहे.
ज्ञानेश्वर महाराज सामाजिक संस्थेचे प्रवीण महाराज सावंत म्हणाले की, कोरोनाचे संकट किती भयानक आहे याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. अशा काळात मंदिरे उघडण्याचा आग्रह धोक्याचा आहे. सरकारने कोणत्याही दबावाला बळी पडू नये; कारण आमचा पांडुरंग आमच्या सोबत आहे.
ठाईच बैसोनी करा एक चित्त
आवडी आनंत आळवावा
असे तुकाराम महाराज यांनी सांगितले. त्याप्रमाणे भाविकांनी घरीच बसून भगवंताचे चिंतन करावे असे आवाहन, रेल्वे प्रवाशी भजन मंडळ महासंघाचे जयराम महाराज पवार यांनी केले आहे.



























































