World cup 2023 – सी ग्रेड संघांना हरवून पाकिस्तान नंबर वन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानने वर्षाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या ‘सी’ आणि ‘डी’ ग्रेडच्या संघांना हरवून वन डे क्रिकेटचे नंबर वन स्थान पटकावल्याची जळजळीत टीका पाकिस्तानचा माजी कसोटीपटू मिसबाह उल हकने केली आहे.

बाप नंबरी आणि बेटा दसनंबरी

27 वर्षांपूर्वी म्हणजे 1996 साली नेदरलॅण्ड्स आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात टीम डी लीडेला जे जमले नव्हते ते त्याचा मुलगा बासने करून दाखवले. त्यावेळी टीम 19 चेंडू खेळूनही आपले धावांचे खाते उघडू शकला नव्हता. मात्र आज त्याचा मुलगा बास डी लीडेने अष्टपैलू कामगिरी केली. त्याने 62 धावांत 4 विकेट आणि फलंदाजीत 67 धावांची आक्रमक खेळी केली.

न्यूझीलंड ठरणार विश्वविजेता?

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने गोऱ्या साहेबांचा पराभव केला. न्यूझीलंडकडून सलामीवीर डेवॉन कॉन्वेने दमदार 152 धावांची नाबाद दीडशतकी खेळी केली. यंदाच्या विश्वचषकात शतकी खेळी करणारा तो पहिला फलंदाज ठरला. मात्र कॉन्वेच्या शतकाचा एक अजब योगायोग आहे. यानुसार न्यूझीलंड यंदाचा चॅम्पियन ठरण्याची शक्यता आहे. जर आपण गेल्या काही वर्ल्ड कपवर नजर टाकली तर 2007, 2011, 2015 आणि 2019 च्या विश्वचषकामध्ये ज्या खेळाडूने पहिले शतक झळकावले आहे तोच संघ विश्वविजेता ठरला आहे. त्यानुसार आता न्यूझीलंड विश्वविजेता ठरण्याचे भाकीत वर्तवण्यात येत आहे.

अस्वच्छतेचे व्हिडीओ व्हायरल

न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड याच्यात झालेल्या सलामीच्या सामन्याकडे चाहत्यांनी पाठ फिरवली. त्यानंतर या मैदानावरील अस्वच्छतेबाबतचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक क्रिकेट चाहत्यांनी पक्षांच्या विष्ठsने माखलेल्या सीट्सचे व्हिडीओ शेअर करत टीका केली.

हिंदुस्थान सर्वात प्रभावी संघ

विश्वचषकाच्या मैदानात उतरलेल्या दहा संघांपैकी हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड हे चार संघ उपांत्य फेरी गाठतील असे भाकीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वर्तवले आहे. हिंदुस्थानी संघ प्रभावी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून विश्वचषक विजेतेपदाची अपेक्षा असल्याचेही सचिन म्हणाला.