
>> वर्णिका काकडे
रत्नागिरी जिह्यातील संगमेश्वर, देवरूख आणि आसपासच्या परिसरात बोलली जाणारी ‘संगमेश्वरी’ ही मराठीची एक अत्यंत रसाळ आणि समृद्ध बोलीभाषा आहे. कोकणातील शेतकरी (कुणबी) समाजामध्ये ही भाषा प्रामुख्याने बोलली जाते. रत्नागिरी जिह्यात कुणबी (शेतकरी) वर्ग खूप मोठय़ा संख्येने आहे. त्यांची बोली ती तिलोरी-कुणबी नावाने ओळखली जाते. ही बोली संगमेश्वर भागात मोठय़ा प्रमाणावर बोली जात असल्यामुळे ही ‘संगमेश्वरी बोली’ असे संबोधले जाऊ लागले. अगदी खेड तालुक्यापासून ते दक्षिणेला राजापूरपर्यंत ही बोली बोलली जाते.
प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर हे प्रश्न विचारूनच देण्याची या बोलीची खासियत आहे. आपल्या विशिष्ट उच्चारशैली, शब्दसंग्रह आणि संवादाच्या लहेजेमुळे ही बोली मराठी भाषेत वेगळेपण टिकवून आहे. संगमेश्वरी ऐकताना वा बोलीचा ठसका, तिचा गोडवा आणि एक प्रकारची मिश्कील झाक पदोपदी जाणवते. यामध्ये ‘स’ चा ‘ह’ आणि ‘य’ चा उच्चार वेगळ्या पद्धतीने होतो. उदा. ‘काय करताय?’ हे ‘कय कर्तानू?’ असं विचारलं जातं. तसेच ‘केळी’ ला ‘केल्डी’, ‘माझे’ ला ‘आम्च्या’ असे शब्द वापरले जातात. वाक्याची रचना प्रमाण भाषेपेक्षा वेगळी असते. उदा. ‘तो गेला’ या ऐवजी ‘तो गेलो’ किंवा ‘निगालास’ (निघालास) अशा वेगळ्या क्रियापदांचा वापर होतो. बोलताना संभाषणात जिव्हाळा असतो. ‘बघूया’ ऐवजी ‘बघूया वो’ अशी आदरार्थी आणि आपुलकीची भाषा वापरली जाते.
संगमेश्वरी बोलीचे अभ्यासक आनंद बोंद्रे यांच्या मतानुसार 400 वर्षांपासून ही बोली अस्तित्वात असून या बोलीतील फटके, कवनं, ओव्या प्रसिद्ध आहेत. या बोलीला पूर्वी सोमगेश्वरी बोली असेही म्हटले जायचे. याचे कारण माखजन पट्टा, खाडी पट्टय़ातील व्यापारी वर्गाची एक सांकेतीक भाषा होती, जी मर्यादित स्वरूपात बोलली जात असे. संगमेश्वरी बोलीचा उगम इथेच झाल्याचे मानले जाते.
1903 मध्ये ग्रियरसन यांनी केलेल्या भाषिक सर्व्हेनुसार तेव्हा केवळ 13 लाख इतकेच या बोलीचे भाषिक उरले होते. आता तर दुर्मीळ बोलीमध्ये या बोलीचा समावेश होऊ शकेल इतकी संख्या घटली आहे.
ही बोली केवळ संभाषणापुरती मर्यादित नसून ‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ यांसारख्या लोकनाटय़ांमधून तिचे जतन केले जात आहे. आनंद बोंद्रे आणि गिरीश बोंद्रे यांनी या बोलीभाषेत लेखन आणि सादरीकरण करून तिला साहित्याच्या पातळीवरही ओळख मिळवून दिली आहे.


























































