एक रुपयासुद्धा खर्च नाही…वसई-विरारकरांना मिळणार मोफत उपचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, वसई

महिला दिनाचे औचित्य साधून आज वसई-विरार महापालिकेने शहरवासियांना खूशखबर दिली. 22 लाख वसई-विरारकरांना आता केसपेपर काढण्यासाठी एक रुपयासुद्धा खर्च न करता संपूर्णपणे मोफत आरोग्यसेवा मिळणार आहे. या योजनेसाठी पालिकेने 83 कोटींची तरतूद केली असून त्याचा शुभारंभ आज करण्यात आला. संपूर्णपणे विनामूल्य आरोग्यसेवा देणारी वसई-विरार महापालिका राज्यातील पहिलीच पालिका ठरली आहे.

वैद्यकीय सेवा मोफत योजनेचा शुभारंभ आज तुळींज हॉस्पिटल, नालासोपारा येथे माजी महापौर प्रविणा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. महानगरपालिकेकडे सध्या 2 रुग्णालये, 3 माता बालसंगोपन केंद्रे, 21 आरोग्य केंद्रे आहेत. या ठिकाणी दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून त्यांना येणारा कमीत कमी खर्चदेखील परवडण्यासारखा नसतो. ही बाब लक्षात घेऊन आरोग्यसेवा मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आता महानगरपालिका रुग्णालयामध्ये उपलब्ध सेवा-सुविधेसाठी कोणत्याही प्रकारचे दर आकारले जाणार नाहीत. कोणत्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत याबाबतची माहिती महानगरपालिका रुग्णालयामध्ये ठळक ठिकाणी प्रदर्शित करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने सुमारे 83 कोटी खर्चाची तरतूद केली आहे. योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमावेळी महापौर रूपेश जाधव, उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज, आरोग्य सभापती राजेंद्र कांबळी, महिला बालकल्याण सभापती माया चौधरी, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले, डॉ. प्रवीण क्षीरसागर उपस्थित होते.

शिशू स्वागत कीटची भेट
बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नवजात बालकांना आता महापालिकेमार्फत शिशु स्वागत किट देण्यात येणार आहे. या शिशु स्वागत किटमध्ये, लहान मुलांचे कपडे, गादी, टॉवेल, थर्मामीटर, तेल, मच्छरदाणी, ब्लँकेट, चटई, शॅम्पो, खेळणी, हातमोजे-पायमोजे, लोकरीचे कपडे या सर्व वस्तूंचा समावेश असणार आहे. नवजात रुग्ण बालकास आवश्यक सुविधा पुरवण्याकामी अर्थसंकल्पात 10 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.