
धोकादायक बनलेला वाशिष्ठी नदीवरील पूल अतिवृष्टीत खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली होती. चिपळुणात आलेल्या महापुरामुळे वाशिष्टी नदीवरील जुन्या पुलाची अवस्था धोकादायक झाली होती.
या मार्गावरून सध्या वाहतूक सुरू असली, तरी लवकरात लवकर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरून वाहतूक सुरू करावी अशी मागणी सातत्याने केली जात होती.
खासदार विनायक राऊत आमदार शेखर निकम आमदार भास्कर जाधव आदींनी यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. गणेश उत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येणार असून मुंबई गोवा महामार्गावरील हा महत्त्वाचा असलेला नवा पूल चालू करण्याच्या दृष्टीने गेले काही दिवस युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.
अखेरीस त्याला यश आले असून आज खासदार विनायक राऊत आमदार शेखर निकम आमदार भास्कर जाधव, जि. प. अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, शौकत भाई मुकादम यांच्या उपस्थितीत या पुलाचा शुभारंभ करण्यात आला आहे. नवीन पूल सुरू झाल्याने गणेशोत्सवादरम्यान होणारी वाहतूक कोंडी आता टाळता येणार असून जून्या पुलावरून होणाऱ्या वाहतूकीला असणारा धोकाही टळला आहे.
























































