नऊ दिवसांत 51 हजार पर्यटक, 21 लाखांचा महसूल; वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान पुन्हा गजबजू लागले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या वर्षी मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून सर्वाधिक काळ बंद असलेले पालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय आता पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजू लागले आहे. त्यामुळे पालिकेचा दररोज बुडणारा लाखोंचा महसूलही वसूल होण्यास सुरुवात झाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी उद्यान सुरू झाल्यानंतर केवळ नऊ दिवसांत 50 हजार 796 पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली आहे. यामुळे पालिकेला 21 लाख 18 हजार 375 रुपयांचा महसूल मिळाला आहे. संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी ही माहिती दिली.

मुंबईत कोरोना नियंत्रणात असला तरी अजूनही दररोज रुग्ण मिळत असल्यामुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय 1 नोव्हेंबरपासून शिस्त, नियम आणि कोरोना खबरदारी घेऊन सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी 1621 पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिली. यामुळे पहिल्याच दिवशी प्रशासनाला 68 हजार 725 रुपयांचा महसूल मिळाला होता. यानंतर पर्यटकांची संख्या आता चांगलीच वाढू लागली आहे. कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे सद्यस्थितीत तीन वर्षांखालील आणि जेष्ठांना मात्र प्रवेश देण्यात येत नाही. पर्यटकांना सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत तर सकाळी 6 ते 8.30 पर्यंत मॉर्निंग वॉकसाठी उद्यान खुले राहणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे बंधनकारक राहणार असून ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि 5 वर्षांखालील लहान मुलांनी शक्यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे किंवा विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अशी होती दीड वर्षाची स्थिती

  • कोरोनामुळे 23 मार्च 2020 पासून देशभरातच लॉकडाऊन लागू करण्यात आला. यामुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आले.
  • यानंतर कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर पुन्हा 15 फेब्रुवारी 2021 पासून उद्यान पुन्हा पर्यटकांसाठी कोरोना खबरदारी घेऊन सुरू करण्यात आले. मात्र कोरोनाची दुसरी मोठी लाट आल्याने 4 एप्रिलपासून पुन्हा उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आले. मात्र आता उद्यान पुन्हा सुरू करण्यात आले आहे.
  • पर्यटक वाढल्याने उद्यान व प्राणिसंग्रहालयाला दररोज सुमारे दीड लाखाचे, महिन्याला 45 लाखांचे तर वर्षाला 8 ते 10 कोटी उत्पन्न मिळते. मात्र गेल्या दीड वर्षापासून उद्यान बंद असल्याने दररोज दीड लाखाचे नुकसान होत होते.