व्हीजेटीआयचे संचालकपद प्रभारी, सेवाज्येष्ठतेनुसार प्राध्यापक नेमा; दहा प्राध्यापकांची शिक्षण सचिवांकडे तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तीन महिन्यांपासून व्हीजेटीआय या शैक्षणिक संस्थेतील संचालकपद प्रभारी असून या पदावर सेवाज्येष्ठतेनुसार पूर्णवेळ संचालकांची नेमणूक करावी, अशी मागणी व्हीजेटीआय मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने केली आहे. पूर्णवेळ संचालक पदावरून डॉ. धीरेन पटेल हे 31 मे 2022 रोजी निवृत्त झाले. त्यांच्या जागी प्रभारी संचालकपदी सुनील भिरूड कार्यभार सांभाळत आहेत.

सेवाज्येष्ठतेच्या नियमानुसार सरळ सेवेद्वारे रुजू झालेले प्राध्यापक हे कालबाह्य पदोन्नतीने रुजू असलेल्या प्राध्यापकापेक्षा ज्येष्ठ मानले जातात. मात्र येथे संपूर्ण नियम डावलून व फक्त तत्कालीन संचालक यांच्या मर्जीनुसार व सेवाज्येष्ठ नसलेले प्राध्यापक सुनील भिरूड यांची नेमणूक केली आहे, असा आरोप व्हीजेटीआयमधील दहा प्राध्यापकांनी केला आहे. त्यांनी आपल्या सहीनिशी या प्रकरणाची लेखी तक्रार तंत्रशिक्षण विभाग आणि उच्च व तंत्रशिक्षण सचिव यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी भिरूड यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष संघटनेनेदेखील या प्रकरणाची दखल घेतली आहे.