
श्रावण महिन्यात स्वस्त झालेल्या भाज्यांनी पुन्हा भाव खाल्ला आहे. गणेशोत्सवात अनंत चतुर्दशीपर्यंत पाळला जाणारा शाकाहार आणि त्यापाठोपाठ येऊ घातलेला पितृपक्ष अशा ऐन सण-म्हाळवसाच्या काळात भाज्या महाग झाल्या आहेत. नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये घाऊक बाजारात आवक दुपटीने वाढली असली तरी मागणी वाढू लागल्याने भाज्यांच्या दारात 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे.
एपीएमसी मार्केटमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडल्यानंतर प्रशासनाने मार्केटवर अनेक निर्बंध लादले होते. हे निर्बंध गणेशोत्सवाच्या तोंडावर शिथिल करण्यात आले. मार्केटमध्ये येणाऱ्य़ा वाहनांची संख्या कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली टोकन पद्धत बंद करण्यात आली. त्यामुळे या आठवड्याच्या सुरुवातीपासून भाजीपाला मार्केटमधील मालाची आवक जवळपास दुपटीने वाढली. आज मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या साडेचारशे गाड्या आल्या. मात्र पुरवठ्याच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे भाज्यांचे दर 15 ते 20 टक्क्यांनी वाढले, असे एपीएमसीचे संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले.
भाज्यांचे दर आताचे पूर्वीचे
भेंडी 40 35
भोपळा 20 15
चवळी 30 28
फरसबी 40 35
फ्लावर 24 20
गवार 60 55
काकडी 26 20
कारली 40 35
कोबी 15 10
दोडके 40 35
टोमॅटो 38 34


























































