
सामना प्रतिनिधी । जालना
संभाजीनगरहुन नांदेडला एका व्यापार्याचे प्लायवूडसाठी लागणारे केमिकल साहित्य घेऊन जाणार्या एका टाटा पिकअपला बदनापूरमध्ये आग लागली. या आगीत साहित्यासह वाहन जळून खाक झाली. त्यामुळे या मार्गावारील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती तर आग विझविण्यासाठी अग्निशामक दल ६ वाजता आले तो पर्यंत आग विझली होती. दरम्यान दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पशु वैद्यकीय दवाखान्याला आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
संभाजीनगरहून नांदेडला एका व्यापार्याचे प्लायवूड साठी लागणारे केमिकल डबे व साहित्य घेऊन टाटा पिकअप हे वाहन निघाले. ५ वाजेदरम्यान बदनापूर जवळ पोहोचले असता चालकास काही तरी जळत असल्याचा वास आल्याने वाहन थांबवले व तपासू लागला असता वाहनाच्या आगीने भडका घेतला व बघता बघता वाहन व साहित्याने पेट घेतल्याने आजू बाजूच्या नागरिकांनी सैरावैरा पळ काढला. आग झपाट्याने वाढल्याने बघ्याची गर्दी जमली व जालना संभाजीनगर महामार्ग रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळ पोलीस पोहोचले व नागरिकांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तर अग्निशामक दल तब्बल एक तासाने म्हणजेच ६ वाजता पोहोचले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर दुसरीकडे दुपारी ३ वाजेच्या सुमारास बदनापूर शहरातील पशु वैद्यकीय दवाखान्यासही अचानक आग लागल्याने दरवाजे व इतर कागदपत्रे जळून खाक झाले आगीचे करण मात्र समजू शकले नाही.



























































