
पाळीव प्राण्यांवर आपण जीवापाड प्रेम करतो. अगदी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतो. मुक्या जिवांना खरचटलं किंवा दुखापत झाली की आपला जीव हळहळतो. एका तरुणाच्या लाडक्या श्वानाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यानंतर त्या तरुणाने प्राण्यांसाठी थेट हॉस्पिटल सुरू केलंय. हे देशातील पहिले पशुवैद्यकीय व्हेंटिलेटर हॉस्पिटल असल्याचा दावा करण्यात येत आहे.
गुजरातमधील शैवल देसाई नावाच्या व्यक्तीने पुरेशा आरोग्य सुविधांअभावी वर्षभरापूर्वी आपल्या पाळीव श्वानाला गमावले. त्यानंतर शैवल देसाईने आता पाळीव प्राण्यांशी संबंधित सर्व गोष्टींचे निराकरण करण्यासाठी मल्टी-स्पेशालिटी आणि ना-नफा पशुवैद्यकीय रुग्णालय उघडले आहे. अहमदाबादमधील हे हॉस्पिटल ओटी रूम्सनी पूर्णपणे सुसज्ज आहे. बेस्ट बड्स पेट असे या हॉस्पिटलचे नाव आहे.
हॉस्पिटलचे संस्थापक शैवल देसाई म्हणाले की, आमच्या श्वानाच्या मृत्यूनंतर मला पाळीव प्राण्यांसाठी मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलची कल्पना आली. खूपच दुःखाचा काळ होता तो… चांगल्या सुविधांअभावी श्वानावर उपचार होऊ शकले नाहीत, म्हणून त्या दुःखातून सावरत मी हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला.
ज्येष्ठ पशुवैद्य डॉ. दिव्येश केळवया म्हणाले, श्वानांमुळे कोरोना विषाणू पसरू शकतो, या अफवांमुळे अनेकांनी श्वानांना सोडून दिले. मी लोकांना विनंती करतो की, त्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवून आपल्या प्राण्यांना सोडू नका.
बेस्टबड्स पेट हॉस्पिटल म्हणजे पाळीव प्राण्यांशी संबंधित सर्व गोष्टींसाठी वन–स्टॉप सोल्युशन आहे. कोणत्याही फायदा न बघता आम्ही हॉस्पिटल सुरू केले आहे, अशी माहिती शैवल देसाई यांनी दिली.
























































