विकी-भूमीच्या ‘भूत’चे पोस्टर लॉन्च, प्रदर्शनाची तारीखही जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत तयार होणारा आगामी हॉरर चित्रपट ‘भूत पार्ट वन’चे पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. हॉरर चित्रपटाच्या सीरिजमधील हा पहिला भाग असून याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. विकी कौशल आणि भूमी पेडनेकरची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट या वर्षी 15 नोव्हेंबरला चित्रपट गृहात झळकणार आहे.

हॉरर चित्रपट ‘भूत पार्ट वन’ सत्य घटनेवर आधारित आहे. भानू प्रताप सिंह यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. करण जोहर आणि शशांक खेताना यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. करण जोहरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचे पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख पोस्ट केली आहे. पोस्टरवर विकी कौशलचा किंचाळतानाचा भयानक फोटो दिसत असून एक हात त्याचा गळा दाबताना दिसत आहे.

दिग्दर्शक शशांक खेताना यांनी चित्रपटाबाबत सांगितले की, ‘करण जोहरला भूत पार्ट वनची कन्सेप्ट आवडली आहे. ही एक सत्य घटनेवर आधारित फिल्म असून मुंबईमध्ये घडलेली ही घटना आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे आणि 15 नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित होईल.’