विदर्भात शेतनुकसानीचे 70 टक्के पंचनामे झालेच नाहीत, नुकसानभरपाई मिळणार कशी, शेतकऱ्यांचा संताप

जून-जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱयांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान वाटप सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्टच्या शेवटी केली होती; परंतु विदर्भात अद्याप 70 टक्के पंचनामे प्रत्यक्षात झालेच नसल्याची धक्कादायक माहिती येथील शेतकऱ्यांनीच दिली आहे. हे पंचनामे कागदावरच असून आपल्या शेतात कुणीच अधिकारी आलेला नसल्याचे काही शेतकऱ्यांनी दै. ‘सामना’शी बोलताना सांगितले.

विदर्भवासीयांवर वरुणराजा दरवर्षीच अवकृपा करतो. यंदाही जुलै महिन्यात यवतमाळ, बुलढाणा येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकेच्या पिके अक्षरशः वाहून गेली. शेतीचा चिखल झाला. या चिखलाकडे पाहत बसण्याशिवाय शेतकऱयांच्या हातात काहीच उरले नाही तर ऑगस्टमधील 21 अधिक दिवस कोरडे गेले. त्यामुळे जुलैमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई तरी सरकारकडून मिळेल या आशेवर शेतकरी आहेत. सरसकट झालेल्या नुकसानीपोटी सरकारकडून भरपाई दिली जाणार आहे; परंतु अद्याप विदर्भातील शेतनुकसानीचे 70 टक्के पंचनामे झालेच नसल्याचे विदर्भातील किसान सभेचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सांगितले.

10 लाखांचा कर्जाचा डोंगर

जुलैमध्ये आणि आता वरुणराजाने दगा दिला. निसर्गाने अवकृपा केल्यामुळे आता माझ्यावर दहा लाखांहून अधिक कर्जाचा डोंगर उभा राहिल्याचे यवतमाळ जिह्यातील जरूर गावचे शेतकरी मोरेश्वर वातीले यांनी सांगितले. तसेच आपल्या शेतातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेल्या दोन महिन्यांत कुणीच अधिकारी फिरकला नसल्याचेही ते म्हणाले. पत्नीच्या नावावरही तीन लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचे त्यांनी सांगितले.

विदर्भात अनेक भागांत मुसळधार तर मराठवाडय़ात रिमझिम

आज गुरुवारी विदर्भात अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. मराठवाडय़ात मात्र मुसळधार पाऊस नव्हता. सकाळपासूनच रिमझिम पाऊस पडल्याचे धाराशीव येथील कास्टी बुद्रुक गावचे शेतकरी नामदेव चव्हाण यांनी सांगितले.

अमरावतीत दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

अमरावती जिह्यात श्री क्षेत्र पाला येथे राहणाऱया मोतीलाल दरसु सिरसाम (55) या शेतकऱयाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीत झालेले प्रचंड नुकसान आणि कर्जामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. तर पोहराबंदी येथे राहणाऱया चरणदास मोहनसिंह चव्हाण (46) या शेतकऱयाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. चरणदास यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.