प्लॅटफॉर्मवरील गर्दी सीसीटीव्हीच्या आवाक्याबाहेर, व्हिडीओ ऍनाटिकल सॉफ्टवेअर फेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

एल्फिन्स्टन रोडवर (प्रभादेवी) स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेने गर्दी मोजण्यासाठी सीसीटीव्हीतील व्हिडीओ ऍनाटिकल सॉफ्टवेअरची चाचणी सुरूच ठेवली आहे. परंतु हे सॉफ्टवेअरदेखील प्रवाशांची नेमकी संख्या सांगू शकत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नेमके किती प्रवासी एकावेळी एका जागेवर उभे राहत आहेत हे समजत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.

मध्य रेल्वेने व्हिडीओ ऍनाटिकल सॉफ्टवेअरची सीएसएमटीत चाचणी घेतली, परंतु सीसीएसएमटीत तर इंडिकेटर्स पाहणार्‍या प्रवाशांच्या गर्दीनेही अलार्म वाजू लागला. वारंवार अलार्म वाजल्याने आरपीएफची धावाधाव होऊन ‘लांडगा आला रे आला’ ची गत होऊ लागली. त्यावेळी अभ्यास केला असता त्यांना हे कॅमेरे माणसांची गणना करीत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पोलिसांची संख्या वाढविणे, स्थानकातील अरुंद प्रवेश मार्ग आणि पादचारी पूल रुंद व प्रशस्त करणे, स्थानकातील अडथळे कमी करणे किंवा हटविणे हे पारंपरिक तंत्रच वापरावे लागणार आहे.

प्रवाशांच्या डोक्यावर छताला कॅमेरे

या कॅमेर्‍यांचे सॉफ्टवेअर संगणकात आपण फिड केल्यामुळे फलाट किंवा पादचारी पुलावरील नेमकी किती टक्के जागा माणसांनी भरलीय याची टक्केवारी संगणकाच्या मदतीने उघडकीस येते. त्यामुळे हे कॅमेरे प्रवाशांच्या डोक्यावर पादचारी पुलांच्या थेट छतालाच बसवावे लागतील. कारण कॅमेरा जर तिरका असेल तर थोड्याशा गर्दीनेही जास्त जागा भरल्याचा चुकीचा संदेश जाण्याची भीती आहे आणि त्यामुळे अपेक्षित गर्दी झाली नसतानाही नियंत्रण कक्षात वारंवार अलार्म वाजेल.

नाशिकच्या तरुणाने ‘असेंबल फूट मॅट’चे तंत्र विकले

नाशिकच्या कुंभमेळ्यात गर्दी मोजण्यासाठी सेन्सरवाल्या चटईचे ‘असेंबल फूट मॅट’ तंत्रज्ञान उपयोगात आणण्यात आले होते. २००३ मध्ये ३९ जणांचा चेंगराचेंगरीत बळी गेल्याच्या घटनेनंतर नीलय कुलकर्णी या तरुणाने ‘असेंबल फूट मॅट’ हे तंत्र विकसित केले होते. २०१५ रोजी नाशिकच्या गोदावरी पात्रात ही ‘असेंबल फूट मॅट’ वापरून कुंभमेळ्याच्या गर्दीचे यशस्वी नियोजन केले होते. हे तंत्रज्ञान या तरुणाने अलीकडेच एका कंपनीला विकल्याचे उघड झाल्याने आता कंपनीशी व्यवहार करावा लागणार आहे.