
मुंबई मेट्रो रेल कॉर्पेरेशनमार्फत बांधण्यात येणाऱया भुयारी कुलाबा-कांद्रे-सीप्झ मार्गिकेवरील विधान भवन मेट्रो स्थानकाच्या (सिमेंट बॉक्स) साच्याचे काम पूर्ण झाले आहे. या विधान भवन स्थानकाला बाहेर आणि आत जाण्याचे एकूण सात प्रवेश मार्ग असणार आहेत. एमआयडीसी स्थानकानंतर साच्याचे बांधकाम पूर्ण होणारे विधान भवन हे दुसरे स्थानक आहे.
विधान भवन स्थानकांत तळाचा स्लॅब, मॅझेनाईन स्लॅब, कॉनकोर्स स्लॅब आणि छताचा स्लॅब या तीन बॉक्स बांधकामाचा समावेश आहे. पॅकेज 7 अंतर्गत येणाऱया एमआयडीसी स्थानकाच्या देखील तिन्ही स्लॅबचे बांधकाम पूर्ण झाले आहे. विधान भवन स्थानकाचे बांधकाम ‘कट आणि कव्हर’ या पद्धतीने करण्यात आले आहे.
75 टक्के काम पूर्ण झाले
‘मुंबई मेट्रो-3 मार्गिकेवरील विधान भवन स्थानकात अधिक वर्दळ असणार आहे. या स्थानकाद्वारे मंत्रालय, विधान भवन, नवीन प्रशासकीय इमारत जोडले जातील. विधान भवन स्थानकाचे 75.45 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. या स्थानकावरून दररोज 75,000 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. पॅकेज -1 अंतर्गत हुतात्मा चौक, चर्चगेट आणि कफ परेड या मेट्रो स्थानकांची कामे देखील वेगात सुरू असल्याचे एमएमआरसाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी म्हटले आहे.

























































