विधान परिषद पोटनिवडणुकीत संजय दौंड बिनविरोध

818

राज्यातील सत्तांतरानंतर जाहीर झालेल्या विधान परिषद पोटनिवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीने आपला पहिला विजय नोंदवला आहे. भाजपचे उमेदवार राजन तेली यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आघाडीचे उमेदवार संजय दौंड विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत.

विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे परळीतून विधानसभेवर निवडून गेल्याने भारत निवडणूक आयोगाने 24 जानेवारी रोजी विधान परिषदेची पोटनिवडणूक जाहीर केली होती. या पोटनिवडणुकीसाठी आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने संजय दौंड यांना तर भाजपने राजन तेली यांना उमेदवारी दिली होती.

या पोटनिवडणुकीत विधानसभेचे सदस्य मतदान करणार होते. विधानसभेत महाराष्ट्र विकास आघाडीकडे 170 सदस्यांचे संख्याबळ आहे. त्यामुळे निवडणूक झाली असती तर तेली यांचा पराभव निश्चित होता. परिणामी आज अर्ज माघारीच्या शेकटच्या दिवशी तेली यांनी उमेदवारी मागे घेतल्याने दौंड यांचा विधान परिषदेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला. दौंड यांची विधान परिषदेवरील मुदत 7 जुलै 2022 पर्यंत राहणार आहे.

संजय दौंड यांचा परिचय
1985च्या विधानसभा निवडणुकीत रेणापूरमध्ये काँग्रेस उमेदवार पंडितराव दौंड यांनी भाजपचे गोपीनाथ मुंडे यांचा पराभव केला होता. विधान परिषदेवर निवडून गेलेले संजय दौंड हे पंडितरावांचे चिरंजीव आहेत. संजय दौंड सध्या बीड जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दौंड कुटुंबाने धनंजय मुंडे यांचा प्रचार केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या