विदर्भात भाजपच्या जागा घटल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विदर्भात विधानसभेच्या एकूण 62 पैकी 61 जागांचा निकाल लागला असून यावेळी भाजपला विदर्भात मोठा धक्का बसला आहे. गेल्या 2014 च्या निवडणुकीत भाजपला 44 जागा मिळाल्या होत्या, तर शिवसेनेला 4 जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी भाजपला मतदारांनी 28 जागांवरच रोखले आहे. तर शिवसेनेला 3 जागांवर विजय मिळाला आहे. भाजप-शिवसेना युतीचे सरकार सलग दुसऱयांदा सत्तेत येत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिथून निवडून येतात त्या विदर्भात भाजपला हा मोठा धक्का आहे. नागपूर जिह्यात भाजपने 8 तर राष्ट्रवादीने 1 तर तीन जागांवर काँग्रेसने कब्जा मिळविला आहे.

विदर्भात महायुतीला पाहिजे तसे यश मिळाले नसून राज्यमंत्री परिणय फुके, सुनील देशमुख, अनिल बेंडे, चैनसुख संचेती, मदन येरावार या दिग्गजांना पराभवाचा फटका बसला आहे. विदर्भात 62 जागांपैकी भाजप 28, शिवसेना 3, काँगेस 16, राष्ट्रवादी काँग्रेस 6, तर 8 अपक्षांनीदेखील बाजी मारली आहे. या अपक्षांमध्ये शिवसेनेचे बंडखोर आशीष जयस्वाल, नरेंद्र भोंडेकर, भाजपचे विनोद अग्रवाल तर काँग्रेसचे किशोर जोरगेवार या बंडखोरांचाही समावेश आहे. डॉ. अनिल बोंडे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या देवा भुयार यांनी पराभूत केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांचा पराभव केला. तर दक्षिण नागपूरमधून अटीतटीच्या लढतीत भाजप युतीचे उमेदवार मोहन मते यांनी काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांचा 4,930 मतांनी पराभव केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे परत एकदा विजयी झाले आहेत. काटोल मतदारसंघातून राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार अनिल देशमुख यांनी भाजपचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांचा पराभव केला. साकोली मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी भाजपचे उमेदवार विद्यमान मंत्री डॉ. परिणय फुके यांचा पराभव केला. यवतमाळमधून राज्यमंत्री मदन येरावार यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांचा पराभव माजी मंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी केला आहे.

गेल्या वेळी काँग्रेसला फक्त 5 जागा आणि राष्ट्रवादीला केवळ 1 जागा जिंकता आली होती. यावेळी काँग्रेसला 16 तर राष्ट्रवादीला 6 जागा मिळालेल्या आहेत. 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत इतिहास घडवणाऱया भाजपला हा धक्का आहे. अमरावतीमध्ये काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनी भाजपचे डॉ. सुनील देशमुख यांना हरवले.

नागपूर जिह्यातील 12 पैकी 5 जागा काँग्रेसने जिंकल्या
नागपूर जिह्यातील 12 जागांपैकी 11 जागा गेल्यावेळी भाजपकडे होत्या. सुनील केदार यांच्यामुळे काँग्रेसमुक्त नागपूर जिल्हा होण्याची नामुष्की टळली होती. यावेळी 12 जागांपैकी 5 जागा जिंकून काँग्रेसने भाजपशी बरोबरी केली. पुतण्याकडून गेल्यावेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढताना राष्ट्रवादीचे देशमुख काटोलमधून पाचव्यांदा विजयी झाले आहेत. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापून भाजपने खळबळ उडवून दिली होती. तिथे कामठीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटय़ाची टक्कर होत शेवटी भाजपचे टेकचंद सावरकर विजयी झाले आहे. सावनेरमध्ये काँग्रेसचे सुनील केदार पाचव्यांदा आमदार बनले आहेत.

चंद्रपूर जिह्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरीची जागा राखली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूरचा किल्ला शाबूत राखला आहे. भंडारा जिह्यातील साकोलीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले आणि भाजपचे मंत्री परिणय फुके यांच्यात काटय़ाची टक्कर होऊन फुकेंना पराभव स्वीकारावा लागला आहे.

देवेंद्र फडणवीस नागपुरातून पाचव्यांदा मोठय़ा मताधिक्याने विजयी झाले आहेत. पण मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नागपूरचा असताना नागपुरात भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधाकर देशमुख यांना हरवून धमाका केला.