
सामना प्रतिनिधी । पुणे
बारामती घडायला 50 वर्षे पवार कुटुंबाला राजकारण करावे लागले. पुरंदर, हवेली मतदारसंघ अवघ्या 9 वर्षांत त्या दिशेने आगेकूच करताना पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या भवितव्याच्या चिंतेने घेरले आहे. त्यांना खासदार सुळे यांची कामे दाखवा म्हटल्यावर राग येतो. कामाच्या मुद्द्याला बगल देऊन वैयक्तिक शेरेबाजी करण्याऐवजी त्यांनी सुळेंच्या कामावर सेल्फी काढावेत आणि जनतेला दाखवावेत, असा टोला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी लगावला.
पुरंदर तालुक्यातील रावडेवाडी (गराडे) येथे 88 लाख रुपये खर्चाच्या पाझर तलावाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सभापती अर्चना जाधव, माजी सभापती अतुल म्हस्के, दादा घाटे, उपसभापती दत्तात्रय काळे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, शालिनी पवार, ज्योती झेंडे, पंचायत समिती सदस्य रमेश जाधव, नलिनी लोळे, भास्कर जाधव, सदाशिव रावडे, गणेश रावडे, दादा रावडे, उल्हास जगदाळे आदी उपस्थित होते. या कार्यकमात माजी उपसरपंच बाळासाहेब रावडे, विशाल रावडे, सागर रावडे, शांताराम रावडे, संजय रावडे, पांडुरंग जगदाळे, प्रमोद फडतरे, भाऊसाहेब रावडे, म्हस्कू रावडे, रामदास रावडे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेतून शिवसेनेत प्रवेश केला.
शिवतारे म्हणाले, गेल्या 4 वर्षांत पुरंदरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी सैरभैर झाली आहे. काँग्रेसच्या नेत्यांना सासवडच्या पाण्याचे धड नियोजन करता आले नाही. त्यांनी गुंजवणीच्या बाता मारणे हास्यास्पद आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सर्वाधिक थापाडे
ह माजी सभापती अतुल म्हस्के म्हणाले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी विस्तारित एमआयडीसी रद्द केली नाही, तर उमेदवारी अर्ज भरणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. तिथे लोकांची फसवणूक केली. 2014 मध्ये अर्ज भरताना आणखी एक थाप मारत एका वर्षात लोकसहभागातून गुंजवणीचे पाणी आणण्याची घोषणा त्यांनी केली. आता त्यावर ते एक शब्द बोलत नाहीत. आता तेच इतरांना थापाडे तेव्हा त्यांची कीव येते, अशा शब्दांत म्हस्केंनी जगताप यांच्यावर टीका केली.





























































