कोपरगाव उपनगराध्यक्ष विजय वाजे यांचा राजीनामा: आता शिवसेनेचा उपनगराध्यक्ष

244

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

कोपरगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी यांनी काल मंगळवारी ३१ महिन्याच्या प्रदीर्घ कालखंडानंतर उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता एक वर्षासाठी शिवसेनेला उपनगराध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.

नगर पालिका निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीने विजय वाजे यांना अडीच वर्षासाठी उपनगराध्यक्षपद बहाल केले होते त्याचा कार्यकाल संपल्याने मंगळवारी (२३) रोजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना-भाजप युतीच्या सर्वच्या सर्व २० नगरसेवकांची व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत वाजे यांचा राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच्या सर्व नगरसेवक १ वाजेच्या सुमारास वाजे यांचा राजीनामा देण्यासाठी नगरपालिकेत गेले प्रारंभी लोकमान्य टिळक यांची जयंती असल्याने विवेक कोल्हे व नगरसेवक यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर नगराध्यक्षा विजय वहाडणे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे दोघेही गैरहजर असल्याने प्रशासन अधिकारी विजयकुमार पाटील यांच्याकडे वाजे यांचा राजीनामा देण्यात आला.

राजीनामा दिल्यानंतर विजय वाजे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पक्षश्रेष्ठींनी आपल्याला शब्द दिल्याप्रमाणे आपला अडीच वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला झाला होता. शिवसेना-भाजप युती असून इतर नगरसेवकांनाही उपनगराध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळावी, अशा भूमिकेतून आणि भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक श्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार आपण या पदाचा राजीनामा देत असल्याचे वाजे यांनी सांगितले.

इच्छुकांची मोठी स्पर्धा असतानाही पक्षाने आपल्याला उपनगराध्यक्षपदासाठी तब्बल ३१ महिने काम करण्याची संधी दिली ही आपल्यासाठी मोठी उपलब्धी असून आपण पूर्णपणे समाधानी आहोत. शब्द दिल्याप्रमाणे शिवसेनेला एक वर्ष उपनगराध्यक्षपद देण्याचा निर्णय आमदार स्नेहलता कोल्हे, बिपिन कोल्हे व मार्गदर्शक विवेक भैय्या कोल्हे व शिवसेना-भाजपा युतीने घेतला असून त्याचे आपण स्वागतच करतो, असेही वाजे यांनी शेवटी सांगितले.

तूर्तास वाजे यांनी राजीनामा दिल्याने त्यांचा राजीनामा मंजूर होऊन रिक्त झालेल्या पदाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयास पुढील कार्यवाहीच्या माहितीसाठी कळविण्यात येऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. येत्या १०-१५ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडून उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. उपनगराध्यक्षपदाच्या राजीनाम्यामुळे नियोजन समितीच्या पदसिद्ध सभापतीपदावरही आता ते नाहीत. स्थायी समितीसह इतर कोणत्याही समितीवर विजय वाजे सदस्य नसल्याने त्यांच्यावर भारतीय जनता पक्ष कोणती जबाबदारी सोपविणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. शिवसेनेच्या कोणाच्या गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडणार या चर्चेलाही आता सुरुवात झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या