
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयकावरून नरेंद्र मोदी सरकारची संसदेत नाचक्की झाली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी त्यावरून भारतीय जनता पक्षावर टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही आज निशाणा साधला. सरसंघचालकपदी महिलांना संधी देणार का, असा बोचरा सवाल त्यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजपवर सडपून टीका केली. देशाचा नकाशा बदलून संविधानावर हल्ला करण्याचा सरकारचा डाव विरोधी पक्षाने हाणून पाडला, असे ते म्हणाले. मनुस्मृती मानणाऱया भाजपात महिलांना नेहमी दुय्यम स्थान दिले जाते. या विधेयकात अनुसूचित जाती, जमाती विशेषतः ओबीसी महिलांच्या आरक्षणाची कोणतीही तरतूद नव्हती, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशाला उद्देशून केलेले भाषण देशाच्या पंतप्रधानांचे नव्हे, तर भाजपच्या नेत्याचे व आचारसंहितेचा भंग करणारे होते, असे वडेट्टीवार म्हणाले. 2023मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी मतदारसंघांची पुनर्रचना होईपर्यंत रोखून धरण्याचे कारण काय होते, असा सवाल त्यांनी केला. महिलांच्या नावाखाली स्वतःची सत्ता वाचवण्याचे भाजपचे प्रयत्न देशातील जागरूक महिलांना नक्कीच समजतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



























































