विखे पाटील भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा बॉम्बगोळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी मुख्यमंत्रिपदाचा केंद्रबिंदू हा नगर जिल्हा असेल. देवेंद्र फडणवीसांना मान्य असो वा नसो, राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातदेखील या शर्यतीत आहेत. या शर्यतीतूनच तांबे बंडखोरी प्रकरण घडले, असा बॉम्बगोळा वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी टाकला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर हे आज संभाजीनगर दौऱयावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील सर्व जागा वंचित बहुजन आघाडी लढणार असून संभाजीनगर शिक्षक मतदारसंघात कालिदास माने हे ‘वंचित’चे उमेदवार असतील, असेही आंबेडकर यांनी यावेळी जाहीर केले.

 आमचे ठरले आहे, युती शिवसेनेशीच

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती होणार हे नक्की आहे. आमचे तसे ठरलेच आहे. या युतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही असावी, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाटते. यासंदर्भातील निर्णय ते घेतील, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आमची युती शिवसेनेशीच (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असल्याचा पुनरूच्चार करताना त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या हिंदुत्वाशी आम्ही नाते जोडत आहोत, असेही ते म्हणाले.