
विक्रोळीतील पश्चिमेकडील एलबीएस रोडला पूर्वेकडील पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा 615 मीटर लांबीचा पूल शनिवारपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. पावसाळय़ातील संभाव्य वाहतूक अडचणी लक्षात घेऊन कोणत्याही औपचारिक समारंभाशिवाय या पुलाचे लोकार्पण केले जाणार आहे. शनिवारी दुपारी 4 वाजल्यापासून वाहतुकीसाठी हा पूल खुला केला जाणार आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली विक्रोळी उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली. पूर्व आणि पश्चिम विक्रोळीला जोडणाऱ्या विक्रोळी पुलाचे पूर्व भागाचे काम एप्रिल महिन्यात तर पश्चिमेकडील पुलाच्या भागावर दोन स्टॅण्ड गर्डर बसवण्यात आल्यानंतर एक गर्डर बसवण्याचे काम 20 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात आले.
अर्ध्या तासाची होणार बचत
पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे पूर्व-पश्चिम बाजू जोडली जाणार आहे. या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्राr मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जाणार आहेत. यामुळे वाहनचालकांचा सुमारे अर्ध्या तासाची बचत होणार आहे.
अशी आहे पुलाची रचना
विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची एकूण रुंदी 12 मीटर तर लांबी 615 मीटर इतकी आहे. त्यापैकी 565 मीटरची उभारणी मुंबई महापालिकेने केली आहे तर तसेच उर्वरित 50 मीटर लांबीपर्यंतची उभारणी मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. या पुलावर महापालिकेने सुमारे 2 हजार 142 टन इतक्या वजनाचे गर्डर टाकले आहेत तसेच या गर्डरची लांबी 25 ते 30 मीटर इतकी आहे. पुलाच्या तीन टप्प्यांत एकूण 18 तुळई टाकण्यात आल्या आहेत.