विळद घाटात कंटेनर-वॅगनरचा भीषण अपघात, कारमधी पती-पत्नीचा जागीच मृत्यू

चालकाचा ताबा सुटून भरधाव कंटेनरने कारला दिलेल्या धडकेत दोनजणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर-मनमाड महामार्गावरील विळद घाटात घडली आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून, नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

रवींद्र किसन पाटील (वय 45), मनीषा रवींद्र पाटील (वय 42, दोघे रा. पाचोरा, जि. जळगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर, त्यांचा मुलगा ऋषिकेश हा या अपघातातून बचावला आहे.

पाचोरा येथील पाटील कुटुंब आज दुपारी नगर-मनमाड महामार्गावरून पुण्याकडे जात होते, तर कंटेनर पुण्याकडून येत होता. भरधाव कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने पाटील यांच्या कारला धडक दिली. यानंतर कंटेनर उलटून पाटील यांच्या कारवर पडला. यात पाटील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहेत. या अपघाताची माहिती पाटील कुटुंबीयांना देण्यात आली असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

चिमुकला आश्चर्यकारकरीत्या बचावला

या भीषण अपघातामध्ये पाटील यांचा नऊ वर्षांचा मुलगा ऋषिकेश हा आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे. एमआयडीसीच्या पोलीस कॉन्स्टेबल कल्पना अवसरे यांच्यासह त्यांच्या पथकाने या मुलाला सुखरूप बाहेर काढले. ऋषिकेशच्या डोक्याला किरकोळ जखम झाली असून, त्याच्यावर विखे पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनरचालक फरार झाला असून, त्याच्या जखमी साथीदारावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या