पुजेसाठी लावलेल्या दिव्याने केला घात, मुलाच्या लग्नाच्या एक दिवस आधी आईचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विलेपार्ले पूर्व येथे सोमवारी उत्तुंग इमारतीच्या तेराव्या मजल्यावर भीषण आग लागून एका 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. भावना सत्रा असे त्या महिलेचे नाव असून त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या एक दिवस आधीच त्यांच्या घराला आग लागली व त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरात लग्नाच्या विधी सुरू असताना लावलेल्या दिव्यामुळे ही आग लागल्याचे समजते.

विलेपार्लेच्या फिरोजशहा मेहता रोडवरील सुविधा पर्ल इमारतीच्या 13 व्या मजल्यावर सकाळी 9.51 वाजता आगीची ठिणगी पडली. आग सर्वात वरच्या मजल्यावर लागल्याने धुराचे लोळ कॉरिडॉर आणि जिन्यावर पसरले. त्यामुळे अग्निशमन दलाला बचावकार्य करताना कसरत करावी लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे 5 फायर इंजिन, 2 जम्बो टँकर, 2 एरियल वॉटर टॉवर टेंडर आणि हायड्रोलिक प्लॅटर्फाम, आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. दुपारी 1.44 वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

दरम्यान या आगीत दोन महिला जखमी झाल्या होत्या. त्या पैकी सत्रा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अनेरी (34) या जखमी झाल्या आहेत.