अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात पहिली ठिणगी पडली, पूर्णगड-मेर्वी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या बैठकीत आरपारच्या लढाईचा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला आहे. त्याविरोधात पूर्णगड आणि मेर्वी पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकवटले आहेत. जीव गेला तरी कोणत्याही परिस्थितीत पूर्णगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी केला असून त्यासाठी उग्र आंदोलन उभारण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

कोकणातील रत्नागिरीमध्ये बारसू आणि पूर्णगड तर सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने अदानी समूह आणि रिलायन्स समूहासोबत सामंजस्य करार केला आहे. त्याची माहिती पूर्णगड व मेर्वी पंचक्रोशीच्या कानाकोपऱयात पसरल्यानंतर संताप व्यक्त होत आहे.

पूर्णगड आणि मेर्वी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तातडीची बैठक बोलवून या प्रकल्पाबाबत चर्चा केली. यावेळी सर्वच ग्रामस्थांनी विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवला. या बैठकीला किरण तोडणकर, शशिकांत म्हादये, ओंकार अभ्यंकर, संतोष कुडतरकर, मंगेश म्हादये, विनोद साळुंखे, अभिजित डोंगरे, विजयकुमार शिंदे, अमृत पोकडे, अन्वर पेजे, तय्यब दरवेश, सुहासिनी धानबा, नम्रता बिर्जे, उदयराज भाटकर आणि रामचंद्र आंबेरकर उपस्थित होते.

लवकरच आंदोलन -किरण तोडणकर

हा प्रकल्प कोकणाला उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे या प्रकल्पाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय पंचक्रोशीच्या बैठकीत सर्व ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यासाठी आंदोलन उभारावे लागणार असून त्याची दिशा लवकरच निश्चित केली जाईल, असा इशारा पावसचे शिवसेना विभागप्रमुख किरण तोडणकर यांनी दिला.

संकट परतवून लावू

पूर्णगड आणि मेर्वी पंचक्रोशीत आंबा-काजू, भात आणि अन्य पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर मच्छिमारी हा या परिसरातील ग्रामस्थांचा व्यवसाय आहे. अणुऊर्जा प्रकल्प आल्यास शेती, बागायती आणि मच्छिमारी उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे गावावर आलेले हे विनाशकारी अणुऊर्जा प्रकल्पाचे संकट परतवून लावण्याचा निर्धार समस्त ग्रामस्थांनी केला.