पुण्यात सराईताकडून एक कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, विमानतळ पोलिसांकडून आरोपी जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमाननगर भागातील सिम्बॉयसेस कॉलेज परिसरात एमडी पावडरची विक्री करण्यासाठी आलेल्या सराईताला विमानतळ पोलिसांच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून तब्बल 1 कोटी 7 लाख 10 हजारांचे 714 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.

अरविंद रविंद्र बिऱ्हाडे (36, रा. अंमळनेर, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बिऱ्हाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर मारामारी,बलात्कार, खंडणी मागणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे असे गंभीर 8 गुन्हे दाखल आहेत. विमानतळ पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत होते.

या दरम्यान एक संशयित व्यक्ती सिम्बॉयसेस कॉलेज जवळ अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती पोलीस नाईक सचिन जाधव यांना मिळाली. यानूसार तपास पथकाने सापळा रचून बिऱ्हाडे याला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतल्यानंतर त्याच्याकडे तब्बल 714 ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. बाजारात त्याची किंमत 1 कोटी 7 लाख एवढी असून आरोपीच्या ताब्यातून पावडर जप्त करण्यात आली आहे.

आरोपीने एमडी पावडर कोठून आणली, याचा शोध विमानतळ पोलीस घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रविंद्र ढावरे, अंमलदार अविनाश शेवाळे, सचिन कदम, सचिन जाधव यांच्या पथकाने केली.