संपूर्ण रत्नागिरी जिल्हा सीसीटिव्हीच्या निगराणीखाली आणणार- खासदार विनायक राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई, पुणे शहराप्रमाणे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हा सीसीटिव्हीच्या निगराणीखाली आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात सर्व ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरा बसवल्यानंतर त्याचा एक कंट्रोल पोलीस अधीक्षक कार्यालयात असेल. यामुळे जिल्ह्यात सामाजिक सुरक्षितता निर्माण होईल. अपघात करुन पळून जाणारी वाहने, गुन्हे करुन पळून जाणारे गुन्हेगार पकडण्यास मदत होईल, असे शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात दिशा समितीची बैठक झाली. या बैठकीत एकूण 41 योजनांवर चर्चा करण्यात आली़. त्यामध्ये सीसीटिव्ही उभारण्याचा विषय प्रामुख्याने चर्चेला आला़. त्याचबरोबर जिल्ह्यात आणखी तीन ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार आहेत, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले़. संसद ग्राम योजनेतून आठ ते नऊ कोटी रुपयांची कामे झाली आहेत़. संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड या गावात रस्ते, मोबाईल टॉवर, पथदिप, प्रत्येक घरी नळाने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे़. याबरोबरच विकासासाठी महिला बचतगट तयार करणे, अन्य समुहगट तयार करण्याची कामे केली जात असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले़.

मुंबई-गोवा महामार्गाचे संगमेश्वर पट्‌ट्याचे काम ठेकेदारामुळे रखडले आहे़. आम्ही स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन संबंधित ठेकेदाराचे काम रद्‌द करुन नवीन ठेकेदार नेमावा अशी मागणी केली आहे़. नवीन ठेकेदार नेमल्यास त्या पट्‌ट्याचे काम वेळेत पूर्ण होऊन तो महामार्ग वाहतूकीसाठी खुला होईल असे राऊत म्हणाले़. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, जि़.प़.अध्यक्ष रोहन बने, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर उपस्थित होते़.