
अवकाळीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाल्याशिवाय विधानसभेचे अधिवेशन शिवसेना चालू देणार नाही, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार विनायक राऊत यांनी दिला. त्यांच्यासह उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी पीक नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
खासदार विनायक राऊत, उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी बुधवारी इगतपुरीतील वाघेरे येथे विष्णू भोर, मोहन भोर, बाळासाहेब भोर, संपत भोर, दशरथ भोर आदी शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या भात पिकाची पाहणी केली. गोंदे दुमाला येथे भरत नाठे यांच्या टोमॅटोची, पाडळी येथे रतन धांडे यांच्या भातशेतीची पाहणी केली. आतापर्यंत कुणीही सरकारी अधिकारी अथवा सत्ताधारी लोकप्रतिनिधी येथे आले नाही. कृषी खात्याचे अधिकारी पाहणी करून गेले. पीक विमा पंपनीचे अधिकारी, कर्मचारी कोणीही फिरकले नाही. त्यांचे सर्व्हर डाऊन असल्याने नुकसानीचा ऑनलाईन क्लेमही करता येत नाही. पिके पूर्णतः सडली असल्याने रब्बी हंगाम वाया गेला आहे, अशी पैफियत शेतकऱ्यांनी मांडली. मागील नैसर्गिक आपत्तीची भरपाई अद्याप मिळालेली नाही. शेतकऱ्यांना फक्त शिवसेनेचाच आधार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना जाहीर झालेली दोन लाख रुपयांपर्यंतचीच कर्जमाफी आम्हाला मिळाली. त्यानंतर सरकारची एक दमडीही मिळाली नाही. आताही शिवसेनाच आम्हाला न्याय देईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते राज्यभर पीक नुकसानीची पाहणी करीत आहेत. त्यांच्या आदेशानेच मी इथे आलो आहे. शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, धीर सोडू नका, असा दिलासा विनायक राऊत यांनी शेतकऱ्यांना दिला. गारपीट व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. त्याला पुन्हा उभे राहण्यासाठी सरकारने सरसकट भरीव अशी भरपाई देणे आवश्यक आहे. नुकसानीचा संपूर्ण अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात येईल. शेतकऱ्यांना पूर्ण दिलासा देणारी मदत मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना आमदार आगामी अधिवेशन चालू देणार नाहीत, असा इशारा विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी आमदार निर्मला गावीत, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, राजेंद्र नाठे, कचरू पाटील डुकरे, विठ्ठल लंगडे, अशोक सुरूडे, हनुमंता गायकवाड, देवानंद बिरारी, महेश बडवे, बाळासाहेब भोर, विष्णू भोर, विनायक गतीर आदी हजर होते.


























































