युनूस सरकार कट्टपंथियांच्या तालावर नाचतंय, ‘चिकन नेक’वरून हिंदुस्थानला धमकावणाऱ्या बांगलादेशी नेत्यांवर शेख हसीनांचा हल्लाबोल

बांगलादेशातील सत्तांतरानंतर तिथे लोकशाहीचा गळा आवळला जात असून, संपूर्ण देश हिंसाचाराच्या आगीत होरपळत असल्याचा खळबळजनक आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे. मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार केवळ नावालाच असून, त्यांच्या हातात सत्ता नसून ती आता कट्टरवाद्यांच्या तालावर नाचत आहे, अशा शब्दांत हसीना यांनी युनूस प्रशासनाचे वाभाडे काढले आहेत.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा विरोधी असलेला बांगलादेशचा विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याची ढाका येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यानंतर बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार सुरू झाला. याबाबत शेख हसीना यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला विस्तृत मुलाखत दिली. यात त्यांनी बांगलादेशातील भयावर परिस्थितीवरून मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारवर हल्ला चढवला.

माझ्या सरकारला ज्या अराजकतेने पायउतार केले, तीच अराजकता आता युनूस यांच्या काळात कैक पटीने वाढली आहे. हिंसाचार हा आता बांगलादेशाचा जणू सर्वमान्य झाला आहे. सरकार एकतर हे सत्य मान्य करायला तयार नाही किंवा हे थांबवण्याची त्यांची लायकी नाही, असा टोला शेख हसीना यांनी लगावला. युनूस सरकारने तुरुंगातील कुख्यात दहशतवाद्यांना सोडून दिले असून, त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. ज्यांचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी जोडलेले आहेत, त्यांना सार्वजनिक जीवनात मोठे स्थान दिले जात आहे. हे केवळ बांगलादेशासाठीच नाही, तर हिंदुस्थानसह संपूर्ण दक्षिण आशियाच्या स्थिरतेसाठी धोक्याची घंटा आहे, असा इशारा हसीना यांनी दिली.

विद्यार्थी नेता हादीच्या अंत्ययात्रेत हिंसाचार, संसदेतील साहित्य लुटले

दीपू चंद्र दास या हिंदू तरुणाची जमावाने केलेल्या निर्घृण हत्येचा संदर्भ देत हसीना यांनी अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला. हिंदुस्थानने या परिस्थितीकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तिथे हिंदूंची कत्तल सुरू आहे, माध्यमांवर हल्ले होत आहेत आणि हिंदुस्थानी दूतावासांना धमक्या दिल्या जात आहेत. ज्या हुल्लडबाजांनी हे कृत्य केले, त्यांना युनूस योद्धे म्हणत आहेत, ही लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका हसीना यांनी केली.

बांगलादेशात सातत्याने हिंदुस्थानविरोधी निदर्शने केली जात आहेत. यावरून हसीना यांनी संताप व्यक्त केला. “आम्ही हिंदुस्थानसोबत मिळून जे काही उभे केले होते, ते सर्व आता उद्ध्वस्त केले जात आहे. जेव्हा एखादे सरकार आपल्या सीमांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखू शकत नाही, तेव्हा जागतिक स्तरावर त्याची विश्वासार्हता संपते. युनूस यांच्या बांगलादेशाची हीच आजची वास्तविकता आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच चिकन नेकवरून हिंदुस्थानला धमकी देणाऱ्या बांगलादेशी नेत्यांनाही हसीना यांनी झोडपून काढले. अशी विधाने धोकादायक आणि बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. ज्या देशासोबत व्यापार, आर्थिक संबंध आणि स्थिरता अवलंबून आहेत, त्या देशाला कोणताही जबाबदार नेता धमकी देणार नाही, असे त्या म्हणाल्या.

संपूर्ण बांगलादेश हादरून जाईल…शरीफ ओसमान हादीला गोळ्या घालण्याआधी आरोपीचा प्रेयसीशी संवाद