नागरिकता कायद्यावरून दिल्लीत पुन्हा हिंसाचार, अनेक वाहनांची तोडफोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागरिकत्व कायद्यावरून दिल्लीत पुन्हा हिंसाचार भडकला आहे. सोमवारी जामिया मिलिया विद्यापीठात हिंसा झाली होती. आता दिल्लीच्या जाफराबाद भागात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडाफेक केली, तसेच तिथल्या वाहनांची तोडफोडही केली. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांचा मारा केला आहे.

परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी ड्रोन मागवले आहेत. तर घटनास्थळी वरिष्ठ पोलिसांनी धाव घेतली आहे. तसेच हिंसाचार भडकलेल्या जागेत अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. उपस्थित जमावाने तीन बसेसची तोडफोड करून इतर वाहनांचेही चांगलेच नुकसान केले.

हिंसाचाराचे स्वरुप पाहता सीलमपूर ते जाफराबादवरील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. या 66 फुटाच्या मार्गात आंदोलकांनी ठिकठिकाणी आग लावल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी इथली वाहतूक बंद केली आहे. तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून दोन मेट्रो स्थानकही बंद ठेवण्यात आले आहेत.