तृणमूल नेत्याच्या हत्येनंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार; 12 घरे पेटवली, 10 जणांचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या हत्येनंतर हिंसाचाराचा आगडोंब उसळला. संतप्त जमावाने प्रचंड जाळपोळ केली. दरवाजे बंद करून 10 ते 12 घरे पेटवून देण्यात आली. यात 10 जण होरपळून ठार झाले. बीरभूम जिल्हय़ातील ही घटना असून, येथे बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

बीरभूम जिल्हय़ातील रामपुरहाट येथे सोमवारी तृणमूल काँग्रेसचे नेते तथा उपसरपंच भादू शेख यांच्या अंगावर बॉम्ब फेकून त्यांची हत्या करण्यात आली. भादू शेख यांच्या हत्येनंतर रामपूरहाट गावात संतापाची लाट उसळली. संतप्त जमावाने गावात जाळपोळ सुरू केली.  10 ते 12 घरांचे दरवाजे बाहेरून लावण्यात आले आणि ही घरे पेटवून देण्यात आली. यात 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह इतर अधिकाऱयांनी रामपुरहाटकडे धाव घेतली. पोलिसांनी एकाच घरातून जळालेले सात मृतदेह बाहेर काढले. या घटनेनंतर संपूर्ण बीरभूम जिल्हय़ात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळून आला होता. या हिंसाचारात जवळपास 16 जण ठार झाले होते.