कुंबळे-कोहली पुन्हा आमने-सामने; आयसीसीच्या समितीचा ‘अंपायर्स कॉल’ला सपोर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचे माजी कर्णधार व प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली पुन्हा आमने-सामने आले आहेत. क्रिकेटच्या मैदानातील अंपायर्स कॉलला काही स्तरांतून विरोध करण्यात आल्यानंतरही अनिल कुंबळे सदस्य असलेल्या आयसीसीच्या क्रिकेट समितीने ‘अंपायर्स कॉल’ला सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीने ‘अंपायर्स कॉल’ला विरोध केला होता. याआधी विराट कोहली व अनिल कुंबळे यांच्यामध्ये मतभेद झाले होते. त्यामुळे अनिल कुंबळे यांना टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरून माघार घ्यावी लागली होती. आता हिंदुस्थानचे दोन महान खेळाडू पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.

बॉल ट्रकिंग टेक्नॉलॉजी 100 टक्के यशस्वी नसते

आयसीसीच्या क्रिकेट समितीची मार्च महिन्यात बैठक पार पडली होती. या नियमाचे महत्त्व खेळाडू व क्रिकेटप्रेमींना चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याची गरज आहे. बॉल ट्रकिंग टेक्नॉलॉजी प्रत्येक वेळी 100 टक्के यशस्वी ठरत नाही. त्यामुळे ‘अंपायर्स कॉल’ हा नियम कायम ठेवायला हवा. असा सूर या बैठकीमधून निघाला होता.

एमसीसी मेंबर्समध्ये दोन गट

क्रिकेटचे नियम बनवणारी ‘मेरीलबोन क्रिकेट क्लब’ (एमसीसी) या संस्थेतील सदस्यांमध्येही या नियमावरून दोन गट तयार झाले आहेत. काहींनी या नियमाला थम्स अप दाखवला आहे. तर काहींना वाटते की, आऊट व नॉट आऊट असा साधा नियम तयार करायला हवा. किचकट नियमाची गरज नाहीए.

नियमाबाबत सर्वांसोबत चर्चा

आयसीसीच्या समितीत अनिल कुंबळे यांच्यासह राहुल द्रविड, ऍण्ड्रय़ू स्ट्रॉस, महेला जयवर्धने, शॉन पोलॉक या क्रिकेटपटूंसह रेफ्री रंजन मदुगले, पंच रिचर्ड इलिंगवर्थ व मिकी आर्थर यांचाही समावेश आहे. या नियमाबाबत या समितीने सामनाधिकारी, ब्रॉडकास्टर्स, हॉक आय व बॉल ट्रकिंग टेक्नॉलॉजीच्या सप्लायर यांच्यासोबत चर्चा केली आहे.

चेंडू स्टम्पला लागल्यानंतर बाद व्हायलाच हवे – विराट

विराट कोहलीने ‘अंपायर्स कॉल’ला विरोध केला आहे. हा नियम विवादित आहे, असे स्पष्टपणे सांगणारा विराट कोहली पुढे म्हणाला, एखादा फलंदाज त्रिफळाचीत झाल्यानंतर चेंडू किती टक्के स्टम्पला लागतो आहे हे बघितले जात नाही. चेंडू स्टम्पला लागल्यानंतर बाद व्हायलाच हवे. ते मग कोणाला पसंत पडो किंवा ना पडो. यामध्ये चर्चा होणे गरजेचे नाही. विराट कोहलीने पुढे नमूद केले की, ‘डीआरएस’ हा नियम नसल्यापासून मी क्रिकेट खेळत आहे. त्या काळात पंचांचा निर्णय अंतिम मानला जात असे. एखादा फलंदाज नॉटआऊट आहे, पण पंचांकडून त्याला बाद दिले गेल्यानंतरही त्या निर्णयाला कोणीही चॅलेंज करीत नसे.