
बांगलादेशविरुद्धचा तिसरा वन डे सामना हिंदुस्थानच्या फलंदाजांनी गाजवला. मालिका गमावल्यानंतर प्रसिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरलेल्या सलामीवीर ईशान किशन याने द्विशतक, तर ‘रनमशीन’ विराट कोहली याने शतक झळकावले. ईशान किशन याने 131 चेंडूत 210 तर विराट कोहलीने 91 चेंडूत 113 धावा चोपल्या.
विराट कोहली याने वन डे क्रिकेटमधील 44वे तर आंतररराष्ट्रीय क्रिकेटमधील 72वे शतक ठोकले. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू रिकी पॉण्टींग याच्या 71 आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमालाही मागे सोडले. आता विराट कोहली याच्या पुढे फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असून त्याच्या नावावर 100 आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद आहे.
सलामीवीर शिखर धवन बाद झाल्यानंतर विराट मैदानावर उतरला. दुसऱ्या बाजूने ईशान किशन अक्षरशः बांगलादेशच्या गोलंदाजांवर तुटून पडत होता. त्याने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक द्विशतकात रूपांतरित केले. दरम्यान, विराट कोहली याला एक जीवदानही मिळाले. त्यानंतर मात्र त्याने एकेरी दुहेरी धावांसह खराब चेंडूंचा समाचार घेत मोठे फटके मारले. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील 44वे शतक पूर्ण करताना 11 चौकार व एका षटकार लगावला. हे शतक त्याने अवघ्या 85 चेंडूवर झळकावले.
IND vs BAN बांगलादेशमध्ये ईशानचे ‘विराट’ वादळ; सचिन, सेहवाग, गेल, रोहितचा विक्रम मोडला
दरम्यान, विराटने तब्बल तीन वर्षाच्या काळानंतर (1214 दिवसानंतर) वनडे क्रिकेटमध्ये शतक पूर्ण केले. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांच्या बाबतीत तो रिकी पॉण्टींग याला पछाडत 72 शतकांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर (हिंदुस्थान) – 100 शतक
विराट कोहली (हिंदुस्थान) – 72 शतक*
रिकी पॉण्टींग (ऑस्ट्रेलिया) – 71 शतक
कुमार संघकारा (श्रीलंका) – 63 शतक
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – 62 शतक




























































