
पाहुण्या इंग्लंडकडून 227 धावांनी पराभव सहन केल्यानंतर कर्णधार विराट कोहली याच्यावर टीका होत आहे. चेन्नईच्या एमए. चिदंबरम मैदानावर कोहलीने गोलंदाजांचा योग्य पद्धतीने वापर केला नाही असा सूर सोशल मीडियावर उमटत आहे. याच दरम्यान, इंग्लंडकडून झालेल्या दारुण पराभवानंतर विराट कोहली याने प्रतिक्रिया दिली असून पहिल्या डावात काही चुका झाल्याचेही मान्य केले.
इंग्लंडने पहिल्या डावात 578 धावा उभारत टीम इंडियावर दबाव टाकला. याबाबत बोलताना कोहली म्हणाला की, आम्ही इंग्लंडच्या संघावर दबाव टाकू शकलो नाही. पहिल्या डावात आम्ही त्यांच्यावर दबाव बनवू शकलो नाही. गोलंदाजांनीही आपल्या गोलंदाजीवर नियंत्रण ठेवले नाही, असेही कोहली म्हणाला.
नो बॉलचा रतीब
चेन्नई कसोटीत टीम इंडियाचे गोलंदाजांना लय मिळाली नाही. या लढतीत टीम इंडियाने पहिल्या डावात तब्बल 21 हून अधिक नो बॉल टाकले, तर दुसऱ्या डावातही 6-7 नो बॉल टाकले. वेगवान गोलंदाजांसह फिरकी गोलंदाजांनीही दोन्ही डावात नो बॉल टाकले. गोलंदाजांच्या या कामगिरीमुळे कोहली नाराज झाला.
#INDvENG हिंदुस्थानी संघाच्या पराभवाला विराट कोहली जबाबदार आहे ?
— Saamana (@SaamanaOnline) February 9, 2021
धावांवर नियंत्रण ठेऊ शकलो नाही…
विराट कोहली म्हणाला की, पहिल्या डावात वेगवान गोलंदाज आणि आर. अश्विनने चांगली गोलंदाजी केली, मात्र आम्ही धावांवर नियंत्रण राखू शकलो नाहीत. धावांवर नियंत्रण राखत विरोधी संघावर दबाव बनवण्याची संधी आम्ही दवडली, असेही तो म्हणाला. तसेच खेळपट्टी संथ होती आणि गोलंदाजांना हवी तशी मदत मिळत नव्हती, त्यामुळे फलंदाजांना एकेरी-दुहेरी धावा काढणे सोपे झाले. पहिले दोन दिवस खेळपट्टीने गोलंदाजांना विशेष साथ दिली नाही, असेही तो म्हणाला.
पलटवार करण्यास सज्ज
दरम्यान, कर्णधार विराट कोहली याने आम्हाला पलटवार करण्यास येते असे म्हणत इंग्लंडच्या संघाला इशारा दिला. आम्ही मालिकेत पुनरागमन करून आणि पुढच्या लढतीत सर्वश्रेष्ठ खेळ करू, असे विराट कोहली म्हणाला.
धावफलक –
इंग्लंड – पहिला डाव 578 आणि दुसरा डाव 178
हिंदुस्थान – पहिला डाव 337 आणि दुसरा डाव 192




























































