कोहली, कुंबळेमधील वादाबाबत धक्कादायक दावा; विनोद राय यांच्या पुस्तकामुळे उठले वादळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वादामुळे हिंदुस्थानचे क्रिकेट ढवळून निघाले होते. पाच वर्षांपूर्वी कॅप्टन आणि कोच आमनेसामने आल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. परिस्थिती एवढी विकोपाला पोहोचली होती की अनिल कुंबळे यांना आपल्या प्रशिक्षकपद सोडावे लागले होते. हा वाद आता सीएजी विनोद राय यांनी पुन्हा एकदा उकरून काढला आहे. विनोद राय यांनी आपल्या पुस्तकामध्ये याबाबत छापले आहे.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर आल्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते आणि सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये बीसीसीआयवर प्रशासक समिती नेमली होती. या समितीचे प्रमुख माजी महालेखा परीक्षक विनोद राय होते. तीन वर्ष त्यांनी बीसीसीआयचा कारभार हाकला होता. याच विनोद राय यांनी आपल्या ‘नॉट जस्ट ए नाइटवॉचमन- माय इनिंग्स इन द बीसीसीआय’ या पुस्तकामध्ये हिंदुस्थानी क्रिकेटमधील वादांवर अनेक खुलासे केले आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’ने विनोद राय यांच्या पुस्तकाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले की, विराट कोहली आणि अनिल कुंबळे याचे कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून नाते काही विशेष खास नव्हते. कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाची चर्चा केल्यानंतर मला कळाले की कुंबळे हे अति शिस्तप्रिय होते. आणि त्यांच्या या वागण्यामुळेच संघातून बहुतांश खेळाडू खूश नव्हते. विराट कोहली कोहली यानेही तरुण खेळाडू अनिल कुंबळे यांना टरकून राहतात असे म्हटल्याचे राय यांनी आपल्या पुस्तकामध्ये नमूद केले आहे.

अनिल कुंबळे यांनी टीम इंडियाचे प्रशिक्षक बनवण्यात आले होते आणि ते संघाच्या भल्यासाठी काम करत होते. मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीला जास्त महत्त्व द्यायला हवे, खेळाडूंच्या त्यांच्याबाबत काय तक्रारी आहेत याकडे दुर्लक्ष करायला हवे होते, असे मत राय यांनी मांडले आहे. यूकेवरून परतल्यानंतर आपण अनिल कुंबळेशी चर्चा केल्याचे राय यांनी म्हटले. संघात जे काही सुरू होते त्यामुळे ते निराश झाले होते. आपल्याला अन्यायकारक वागणूक मिळाल्याची भावना त्यांच्या मनात होती आणि कर्णधार, संघाला जास्त महत्त्व देऊ नये असे त्यांचे मत होते. संघाला शिस्त लावणे आणि व्यावसायिकता आणणे हे प्रशिक्षकाचे कर्तव्य आहे. एक वरिष्ठ खेळाडू म्हणून त्यांचा सन्मान करायला हवा होता, असेही राय यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.

हा मुद्दा तापल्याने अनिल कुंबळे यांनी पायउतार होण्याचे ठरवले. हे अनपेक्षित होते, असे राय यांनी म्हटले आहे. त्यावेळी बीसीसीआयच्या सल्लागार समितीमध्ये सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे होते. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान त्यांनी विराट आणि कुंबळेशी चर्चाही केली. सीईओ जोहरी आणि कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी यांनीही दोघांची संवाद साधला. मदभेद खूप जास्त असल्याने फक्त सीएसी हेच दोघांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ शकतात, असेही विनाद राय यांनी म्हटले. यानंतर सीएसी लंडनला गेले आणि दोघांशी वेगवेगळ्या पातळीवर चर्चा केली. वाद मिटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तीन दिवस सलग चर्चा केल्यानंतर त्यांनी अनिल कुंबळे यांना पुन्हा प्रशिक्षक बनवण्याचा निर्णय घेतला. परंतु तोपर्यंत अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.