IPL 2020 – विजयाची गोल्डन ज्युबिली!  50 सामने जिंकणारा विराट  ठरला चौथा कर्णधार

विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सोमवारी रात्री सनरायझर्स हैदराबादला 10 धावांनी पराभूत करीत आयपीएलमध्ये दमदार श्रीगणेशा केला. विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 50व्या विजयाला गवसणी घातली. आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्वात 50 किंवा त्यापेक्षा जास्त लढती संघाला जिंपून देणारा विराट कोहली हा चौथा कर्णधार ठरलाय. याआधी महेंद्रसिंह धोनी (105), गौतम गंभीर (71), रोहित शर्मा (60) यांनीही ही करामत करून दाखवलीय.  

या स्पर्धेत 50 किंवा त्यापेक्षा जास्त सामन्यात विजय मिळवणारे कर्णधार 

महेंद्रसिंह धोनी        –         105 विजय

गौतम गंभीर   –       71 विजय

रोहित शर्मा    –       60 विजय

विराट कोहली         –         50 विजय

एकाच संघाचे नेतृत्व करणारे

चार सर्वोत्तम कर्णधारांच्या यादीत एकाच संघाचे नेतृत्व करणारे दोनच कर्णधार आहेत. विराट कोहली व रोहित शर्मा ही त्यांची नावे. रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी 105 सामन्यांत नेतृत्व केले आहे. यापैकी 60 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने विजय मिळवलाय, तर 43 सामन्यांत त्याच्या नेतृत्वात पराभवाचा सामना करावा लागलाय. विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 111 लढतींपैकी 50मध्ये विजय मिळवलेत तसेच 55 लढतींत हार सहन करावी
लागली आहे.

पडिक्कल, डिव्हिलियर्स, चहल, सैनीचा ठसा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादला हरवत महत्त्वाचे दोन गुण मिळवले. या विजयात देवदत्त पडिक्कल, ए. बी. डिव्हिलियर्स, युजवेंद्र चहल व नवदीप सैनी यांनी मोलाची कामगिरी बजावली. देवदत्त पडिक्कल (56 धावा), ए. बी. डिव्हिलियर्स (51 धावा) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 163 धावा तडकावल्या. युजवेंद्र चहल (18 धावांत तीन बळी) व नवदीप सैनी (25 धावांत दोन बळी) यांनी प्रभावी गोलंदाजी करीत सनरायझर्स हैदराबादला 153 धावांपर्यतच रोखले. युजवेंद्र चहलची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.  

गंभीर, धोनी यांनी भुषवले दोन संघांचे कर्णधारपद

महेंद्रसिंग धोनी व गौतम गंभीर यांनी प्रत्येकी दोन संघांचे कर्णधारपद भुषवले आहे. महेंद्रसिंग धोनी याने चेन्नई सुपरकिंग्ससह रायझिंग पुणे सुपरजायंटस् या संघाचे नेतृत्वही केले. एपूण 175 सामन्यांमध्ये नेतृत्व करताना त्याला 105 लढतींमध्ये यश मिळाले आहे. यापैकी चेन्नई सुपरकिंग्सला 100 विजय मिळवून देण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला आहे. गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्ससह दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघाचेही नेतृत्व सांभाळले होते. 129 सामन्यांमध्ये त्याने पॅप्टन म्हणून भूमिका बजावली. त्यापैकी 71 सामन्यांमध्ये विजय मिळवण्यात त्याने बाजी मारलीय.

आपली प्रतिक्रिया द्या