
शुभमन गिल तर हिंदुस्थानच्या अंतिम 11 खेळाडूंमध्येही बसत नाही. अशा खेळाडूची संघाच्या नेतृत्वपदी निवड कशी केली जाते, असा सवाल करत हिंदुस्थानचा माजी आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग बीसीसीआयच्या निवडीवर चांगलाच भडकला.
हिंदुस्थानचा कर्णधार म्हणून शुभमन गिल हा दुसरा सर्वात चांगला पर्याय होता. कर्णधारपदाचा खरा दावेदार जसप्रीत बुमरा होता. परंतु जो हिंदुस्थानच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही फिट नाही त्याला कसोटीचे कर्णधारपद कसे दिले जाते? बुमरावर अतिरिक्त जबाबदारी न देण्याच्या निवड समितीच्या निर्णयाबाबत तो सहमत होता. बुमराचे नेतृत्व एका मालिकेसाठी योग्य आहे. जर तो एका वर्षात हिंदुस्थानसाठी दहा कसोटी खेळत असेल तर बुमराला विचारणे योग्य आहे. तो इतके सामने सलग खेळू शकेल का? तो किती सामने संघासाठी खेळू शकतो? याच कारणामुळे त्याला नेतृत्व गमवावे लागल्याचे सेहवाग म्हणाला.
कसोटी क्रिकेटमध्ये फार कमी गोलंदाजांना कर्णधार बनविण्यात आले आहे. माझ्या कारकीर्दीत केवळ अनिल कुंबळे हाच गोलंदाज होता. हा फॉरमॅटही त्यांच्या आवडीचा होता. ते उपलब्धही होते आणि त्यांचा अंतिम संघातील सहभागही निश्चित होता, असेही सेहवागने सांगितले.
आगामी कर्णधार ऋषभ पंतच
जर पंत आगामी काळात फलंदाजीच्या फॉर्मात ततुफान खेळला तर तो हिंदुस्थानचा भावी कर्णधार असेल. त्याने ज्या पद्धतीने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी केलीय, त्याच्यासारखे अन्य कुणीही करू शकलेला नाही. कोहलीनंतर कसोटी क्रिकेटसाठी कुणी असेल तर तो पंतच आहे. त्याने क्रिकेटप्रेमींना कसोटी क्रिकेट पाहाण्यासाठी भाग पाडलेय. अडीच वर्षांपूर्वी तो कार अपघातात जखमी झाला. मग तो पुन्हा खेळू लागला. संघातही त्याने पुनरागमन केले. त्याचा जास्त प्रभाव पडला नाही. तरीही त्याला उपकर्णधार बनविण्यात आले आहे. जर तो फॉर्मात आला तर त्याच्या हातात हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व सोपविले जाऊ शकते, म्हणूनच हा प्रकार केल्याची शक्यता सेहवागने बोलून दाखवली.